जामखेड न्युज – – – –
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर पाहायला मिळतो. परंतु आज अंगावर काटा आणणारी घटना घडली.बिबटयाने भरवस्तीत धुमाकूळ घातला. श्रीरामपूर शहरात भरवस्तीत बिबट्याने हौदोस घालत परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांसह पाच जणांवर हल्ला केला.
रविवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली. या परिसरातील लोक वस्तीत बिबट्या लापल्याची चर्चा असल्यामुळे नागरिकात भितिचे वातावरण तयार झाले आहे.आज सकाळी अचानक मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोडला काही लोकांनी बिबट्या आल्याचे पाहिले. बिबट्याला पहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली.
या दरम्यान बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात एक पुरुष व महिलसह दोन लहान मुले व काही जनावरेही गंभीर जखमी झाले आहेत. कांता कुमावत, राहुल छल्लारे, बाळासाहेब अडांगळे अशी जखमींची नावे आहेत.त्यानंतर या बिबट्याने परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांवर देखील हल्ला केला. यात श्रद्धा हिंगे आणि वृषभ निकाळजे हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.घटनेची माहिती मिळताच आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक तसंच अनेक लोक प्रतिनिधींसह पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. हा बिबट्या श्रीरामपुरातील मोहटादेवी मंदिर रोड, वॉर्ड नं.७ परिसरात एका घराच्या बाहेर बोळीत बिबट्या लपला होता. त्यानंतर वन अधिकारी व पोलिसांना बिबट्याला पकडण्यात यश आले असून त्याला इंजेक्शनद्वारे बेशुध्द करण्यात आले.





