जामखेड प्रतिनिधी
महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्य चांगले राहिले तर कुटुंब आनंदी राहते असे सौ. शितल गणेश काळे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमात मत व्यक्त केले.
शिवसेना शहरप्रमुख गणेश काळे मित्रमंडळाच्या वतीने शितल गणेश काळे यांनी प्रभाग सातमध्ये तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण यावर जनजागृती करण्यात आली.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख गौरी शंकर कुचेकर, दुर्गा ढवळे, मनिषा काळदाते, शुभांगी गळगटे, अहिल्या राळेभात यांच्या सह सुमारे चारशे महिला उपस्थित होत्या. मकरसंक्रांतीनिमित्त महिला मंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शितल काळे यांनी सांगितले.