तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनात स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त – कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न – पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

0
249
जामखेड न्युज – – – – 
    
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी निवासस्थानासमोर गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल शासन, प्रशासनाने घेतली नाही. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संतापाने ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला. तसेच रफीक शेख या कार्यकर्त्याने बुलडाणा येथील अन्नत्याग आंदोलनासमोर अंगावर डिझेल घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
संतप्त झालेले कार्यकर्ते व पोलिसांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटल्या. दंगा काबू पथक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त अन्नत्याग आंदोलन परिसरात वाढवला आहे. या आंदोलनाचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. रास्ता रोको करून संतप्त कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी एल्गार मोर्चाद्वारे शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी आंदोलनाची दखल न घेतल्याने तसेच नागपूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक करून प्रकृतीच्या कारणास्तव बुलडाणा निवासस्थानी पोहोचविले. त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली.
शेतकर्‍यांच्या सोयाबीन व कपाशीला 8 हजार व 12 हजाराचा स्थिर भाव द्यावा, सोयाबीन पेंड आयात तात्काळ रद्द करावी, सोयाबीन व तेलबिया साठा मर्यादा उठवावी, 100 टक्के पीकविमा द्यावा,खोटे अहवाल बनवून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अतिवृष्टी ग्रस्तांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, महावितरण ने लोडशेडिंग थांबवावी या व इतर मागण्यांसाठी शासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here