जामखेड तालुक्यातील निवडणूक असलेल्या 49 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या 39 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली आज मतमोजणी झाली यात राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडीने जोरदारपणे मुसंडी मारत 49 पैकी 40 ग्रामपंचायतवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपकडे केवळ नऊ ग्रामपंचायती राहिल्या आहेत.
जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी 417 सदस्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या म्हणजे 117 सदस्य बिनविरोध झाले तर आघी येथील एक जागा रिक्त आहे. 299 सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत 40 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या तर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या ताब्यात 40 ग्रामपंचायती आल्या आहेत. भाजपची नऊ ग्रामपंचायत वर सत्ता राहिली आहे.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावात, रवी सुरवसे यांच्या खर्डा गावात, डाॅ. भगवान मुरुमकर यांच्या साकत गावात, सुभाष जायभाय यांच्या तेलंगशी, लहु शिंदे यांच्या अरणगाव मध्ये भाजपाची सत्ता संपुष्टात आली आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
बापुराव ढवळे यांनी पिंपरखेड हसनाबाद, केशव वनवे यांनी बांधखडक, महारुद्र महारनवर यांनी धामणगाव, दादासाहेब दाताळ यांनी बाळगव्हाण, तसेच आनंदवाडी, जायभायवाडी, तरडगाव, या ग्रामपंचायत वर भाजपाने आपली सत्ता राखली आहे.
खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा करिश्मा ग्रामपंचायत निवडणुकीत चालल्याचं दिसून येतंय. येथील जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपाला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय. भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. आमदार रोहित पवार यांनी येथील ग्रामपंचायती निवडणुकीकडे स्वत:हून लक्ष घातले होते. त्याचाचा हा परिणाम असल्याचं दिसून येतंय. या निवडणुकीत विजयसिंह गोलेकर यांच्या खर्डा ग्रामविकास आघाडीने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी साकत ग्रामपंचायत वर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांची दहा वर्षांपासून सत्ता होती यावेळी मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट व साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा अरूण वराट यांच्या नेतृत्वाखालील साकेश्वर परिवर्तन पॅनलकडे 7 जागा तर भगवान मुरुमकर यांच्याकडे चार जागा आहेत. कोल्हेवाडी दोन उमेदवार स्वतंत्र आहेत. संजय वराट यांचे पाच उमेदवार निवडून आले व बिनविरोध आलेले दोन त्यांच्याकडे आले असे सात सदस्य झाले आहेत.
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, गावातील चार व कोल्हेवाडी येथील दोन सदस्य आमच्याकडे आले आहेत त्यामुळे अकरा पैकी सहा सदस्य आमचे आहेत व एक जागेचे प्रकरण न्यायालयात आहे.
पण आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्वच जागेचे निकाल जाहीर केले. सध्या संजय वराट यांच्या कडे सात तर
जर कोल्हेवाडीचे दोन सदस्य डॉ. भगवान मुरुमकर यांच्या कडे आले तर त्यांचे सहा होतील.
प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपाचा पॅनल पराभूत झाला असून अक्षय शिंदे व अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. पाडळी, तेलंगशी येथेही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
अरणगाव मध्ये संतोष निगुडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल बहुमताने निवडून आला पण निगुडे पराभूत झाले त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी गत झाली आहे. पिंपरखेड हसनाबाद मध्ये बापुराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला बहुमत मिळाले आहे.
जामखेड तालुक्यातील 417 सदस्यांपैकी 307 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे आहेत तर 106 सदस्य भाजपाचे आहेत. चार इतर असे आहेत.
आज सकाळी नऊ वाजता मतमोजणीला तहसिल कार्यालयात कडेकोट बंदोबस्त सुरूवात झाली. तेरा टेबल लावण्यात आले होते. दहा फेरीत संपुर्ण मतमोजणी झाली निवडणूक निरीक्षक म्हणून गणेश मिसाळ हे अधिकारी होते. तहसीलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली तर बाहेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.
अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांची माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला आणी विजयाची घोडदौड सुरू झाली आहे.