जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाचा समतोल राहिला तर सर्व गोष्टी ठीक होतात. परंतु अलीकडील काळात काही विपरीत बदल निसर्गात घडत आहेत. मानवाचा हस्तक्षेपच याला कारणीभूत आहे. जामखेड परिसरातील अनेक ठिकाणी कडूनिंबाची शेंडे करपू लागल्याने अनेक रोगांवर बहुगुणी असणाऱ्या या झाडालाच नेमके काय झाले आहे. हे समजण्यास मार्ग नाही.
सदाहरित आणि औषधी असणारे कडूनिंबाच्या झाडांचे शेंडे करपून वाळू लागले आहेत. असून सर्वच झाडांच्या फांद्यांचे शेंडे करपल्याचे अवस्थेत दिसत आहेत. यापूर्वी असे कधीच घडले नसल्याने कडूनिंबाच्या शेंडे करपण्याचे नेमके कारण कृषीतज्ज्ञांनी स्पष्ट करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नैसर्गिकरित्या उगवणारे व एक बहुपयोगी झाड म्हणून याची ओळख आहे.
याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात म्हणून याचे नाव कडुलिंब पडले. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्वच कडू असतात. हे झाड औषधी असून त्याचा अनेक रोगांवर इलाज चालतो.
कडूलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात आज देखील याचा उपोयोग केला जातो. परंतु अशा रोगनिवारक झाडालाच अशा पद्धतीने अपाय होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कडुलिंबाचे शेंडे करपू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिक हवालदिल झाले आहे. हे झाड वाचविण्यासाठी कृषितज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.