जामखेड न्युज – – –
वयाची शंभरी गाठलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (BJP leader Rajabhau Deshpande) यांची केंद्रीय अवजड रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी आज सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. गडकरींच्या या भेटीनंतर देशपांडे यांनी पक्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजाभाऊ देशपांडे यांना केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पेढ्यांचा हार घालून सन्मानित करण्यात आले. त्या सन्मानाने देशपांडे व त्यांचा परिवार सद्गदित झाला. अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या राजाभाऊ देशपांडे यांचा आज झालेला सत्कार अनेक अर्थाने चर्चेत राहिला.
जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून राजाभाऊ देशपांडे यांचा उल्लेख होतो. वयाची शंभरी पार केलेले देशपांडे अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. मात्र, पक्षामध्ये आजही त्यांच्या शब्दाला वजन आहे. यांचे चिरंजीव नितीश देशपांडे अधिकारी म्हणून कार्यरत होते, मात्र तेही सध्या अलिप्त आहेत. राजाभाऊ देशपांडे यांनी नुकताच शंभरी प्रवेश केला आहे. राजाभाऊ देशपांडे यांचे भाजपमधील योगदान लक्षात घेऊन भाजपचे अनेक नेते त्यांना आदर्श मानतात. केंद्रीय मंत्री गडकरी कार्यक्रमानिमित्त आज कराडच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यामध्ये मंत्री गडकरी यांनी आवर्जुन ज्येष्ठ नेते देशपांडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये दोघांनी पक्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, मंत्री गडकरी यांनी राजाभाऊ देशपांडे यांचा 100 पेढ्यांचा हार घालून सत्कार केला. मंत्री गडकरी यांच्याकडून झालेल्या सत्काराबद्दल राजाभाऊ देशपांडे व त्यांचे कुटुंबीय सद्गदित झाले. कुटुंबीयांच्या वतीने मंत्री गडकरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नितीश देशपांडे व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
पक्षाची वाटचाल कशी सुरू आहे? याबाबत राजाभाऊ देशपांडे यांनी गडकरी यांना आवर्जून विचारले. त्यांनीही संघटना बांधली आणि देशातील विकास थोडक्यात सांगितला. मंत्री गडकरी यांनी देशपांडे यांच्या प्रकृतीची चौकशी करून काहीही गरज लागल्यास, संपर्क साधण्याचे स्पष्ट सांगितले. मंत्री गडकरी व राजाभाऊ देशपांडे यांची भेट परिसरातील नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय होता. अनेक नागरिक रस्त्यावर थांबून घरावर चढून त्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी धडपडत होते. देशपांडे यांच्या घरातून बाहेर पडलेल्या गडकरी यांनी बाहेर थांबलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर ते पुढच्या दौऱ्याला रवाना झाले.