जामखेड न्युज – – –
सोयाबीन हे जागतिक स्थरावरील पिक असले तरी याच्या दराचा थेट संबंध हा शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहपर्यंत आहे. खरिपातील हे मुख्य पीक असून यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र, गेल्या दोन दिवसातील सोयाबीनचे दर हे शेतकऱ्यांना धडकी भरवणारे आहेत. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक यामध्ये शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती होत आहे. त्यामुळे काढणी करून सोयाबीनची मळणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला महत्वाचा आहे.
चार दिवसापूर्वी सोयाबीनचे दर हे 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल होते. त्यामुळे पावसाने नुकसान झाले तरी वाढीव दरामुळे चांगले पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र, नविन सोयाबीनची आवक सुरु होताच दर कमालीचे घसरलेले आहेत. दोन दिवसाच्या फरकाने सोयीबीन थेट 6 हजारावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे भविष्यात अणखीन दर घटले तर अधिकचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीनची विक्री करावी का भविष्यात दर वाढतील या आशेने साठवणूक अशी द्वीधा मनस्थिती झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी गडबड न करता सोयाबीनची साठवणूक करण्याचा सल्ला लातूर येथील व्यापारी बालाप्रसाद बिदादा यांनी दिला आहे.
यंदाच्या हंगामातील नविन सोयाबीन हे बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे दर घटणार हे अपक्षित होते पण अपेक्षेपेक्षाही जास्त घसरण ही झालेली आहे. अशा काळात शेतकऱ्यांनी जेवढी पैशाची आवश्यकता आहे त्या प्रमाणातच सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे.
आवक वाढल्याने दरामध्ये अस्थिरता आहे. भविष्यात आवक किती होणार आणि कोणत्या स्टेजला सोयाबीनचे दर स्थिर होणार हे पहाणे महत्वाचे राहणार आहे. त्यानंतर दरामध्ये वाढ होण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता योग्य बाजार भावाची प्रतिक्षा करणेच फायद्याचे राहणार आहे.
सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ
सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पिक आहे. यापुर्वी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कापसाचीही लागवड केली जात होती. मात्र, गेल्या चार वर्षापासून सोयाबीनलाच अधिकची पसंती दिली जात आहे. नगदी पीक आणि योग्य दर यामुळे यंदा तर राज्यात तब्बल 52 लाख हेक्टरावर पेरा झाला होता. यामधून मोठ्या उत्पादनाची अपेक्षा होती पावसाच्या लहरीपणामुळे पिकाचे नुकसान झाले आहे तर आता दर कमी होत असल्याने चिंता वाढलेली आहे.
सोयापेंड आयातीचा परिणाम होणार का?
केंद्र सरकारने सोयापेंडची आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही दिवसांमध्ये सोयापेंड ही आयात होण्यास सुरवातही होईल पण जागतिक स्थरावरील सोयाबीनच्या दराची स्थिती पाहता याचा परिणाम दरावर होणार नसल्याचे व्यापारी बालाप्रसाद बिदादा यांनी सांगितलेले आहे. 5500 ते 6500 हा सोयाबीनचा स्थिर दर आहे. याच बरोबरीत भविष्यात दर राहतील. मात्र, ते 8 हजार किंवा 9 हजार पर्यंत जाणार नाहीत असेही ते म्हणाले आहेत.
मेहनत, पावसाने नुकसान अन् आता दराची चिंता
पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना केवळ मेहनतच करावी लागलेली आहे. सोयाबीन बहरात असताना किडीचा प्रादुर्भाव आणि काढणीच्या प्रसंगी पावसाने सोयाबीन झोडपले यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. आता समाधानकारक दर मिळतील अशी आशा होती तर दोन दिवसामध्ये चार हजाराने दर घसरलेले आहेत.