जामखेड न्युज – – –
साई बाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. मात्र, या विश्वस्त मंडळ नियुक्तीवरुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दणका दिलाय. न्यायालयाच्या परवानगी शिवाय विश्वस्त मंडळाने पदभार घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही असा आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाच्या परवानगीनंतरच सरकारने नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे. गेल्या दोन वर्षापासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता. दरम्यान, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत अॅड. अजिंक्य काळे यांनी फोनद्वारे माहिती दिली आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ
साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ 16 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्षपदी अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळात कोण-कोण?
1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष
2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष
3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य
4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य
5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य
6. सचिन रंगराव गुजर – सदस्य
7. राहुल कनाल – सदस्य
8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य
9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य
10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य
11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य
12. सभापती, शिर्डी नगर पंचायत
कोण आहेत आशुतोष काळे?
35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.
काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.