जामखेड न्युज – – –
मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन सदृश रसायनाची गाईच्या दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्या दूध संकलन केंद्र चालकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नाशिक येथील अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने ही बाब उघडकीस आणली. दुधात भेसळ करुन त्याची विक्री करण्याचा हा प्रकार उघड झाल्यामुले संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सोयाबीन रिफाईंड तेल पॅराफीन मिसळून दूधविक्री
मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील पाथरेमध्ये अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ याचे श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. पाथरे व परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले गाईचे दूध तो जवळके तालुका कोपरगाव येथील न्यू शनेश्वर दूध संकलन केंद्रात विकतो. दूध व्यवसायात अधीकचा नफा मिळवण्यासाठी अक्षय शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधामध्ये पावडर, सोयाबीन रिफाईंड तेल आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या ‘पॅराफीन’ सदृश्य रंगहीन रसायनांची भेसळ करत असल्याचे समोर आले. तसेच या भेसळयुक्त दुधाची तो विक्री करत होता. नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने या प्रकाराची माहिती झाली. दूध भेसळीची माहिती होताच अक्षयवर कारवाई करण्यात आली.
दुधात भेसळ करत असल्याचे केले कबूल
दरम्यान,अक्षय गुंजाळचा कारनामा समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केलीय. अक्षय दुधात भेसळ करण्यासाठी लागणारे रसायन शेख नामक व्यक्तीसह हेमंत पवार या इसमाकडून विकत घेत होता. खरेदीचा हा सर्व व्यवहार त्याने कबूल केला आहे. अक्षय गुंजाळने गुन्हा कबुल केल्यानंतर अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी वावी पोलीस ठाण्यात चार जाणांविरोधात फिर्याद दिली आहे. तसेच सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चारही जाणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ तर उडाली आहेच, मात्र या दूध भेसळ करण्याच्या या कारस्थानामध्ये अनेकजण सामील असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.