कोवीड लसीकरण, अतिवृष्टी, ई-पीक पाहणी आदी विषयांचा घेतला महसुलमंत्र्यांनी घेतला आढावा

0
217
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत.” अशा शब्दात महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवार दि.१७.०९.२०२१ रोजी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री.राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त श्री.शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.जे.डी.कुलकर्णी,  निवासी उपजिल्हाधिकारी श्री.संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  विरेंद्र बडदे ,आमदार लहू कानडे आदी उपस्थित होते.
    थोरात म्हणाले, जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी गणपती विसर्जनाला कोठेही गर्दी होणार नाही. यासाठी प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.  प्रत्येक तालुक्यात नियमितपणे कोवीड चाचणी होत आहेत. अशावेळी आरोग्य प्रशासनाने दिवसाला जास्तीत  जास्त कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.   कोरोना सोबत चिकनगुनिया, डेंग्यू यासारखे साथीचे आजार वाढत आहेत. यावर आरोग्य प्रशासनाने सतर्क राहून शहरांमध्ये आरोग्य फवारणी करावी. अशा सूचनाही श्री.थोरात यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या.
महसूल प्रशासनाचा आढावा घेताना थोरात म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, सोयाबीन, कांदा या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारांच्या संख्येने पशुधन पुरात वाहून गेले आहे. जिल्ह्यातील २३९२८ हेक्टर क्षेत्रावर या अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. तेव्हा स्थानिक स्तरावरील महसूल प्रशासनांच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करावेत.ई-पीक पाहणीच्या  कामाला गती देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी बंद असलेला वाळू लिलाव तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्वांनी महसूल सप्तपदीचे पालन करावे.अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, आज पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात २३ लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहे. १५९४ गावांपैकी ८९४ गावे कोरोना मुक्त झाले आहेत.  ‘ई-पीक पाहणी’ ॲप वर  जिल्ह्यातील  २ लाख हेक्‍टरवर वरील पिकांची ‘ई-पीक पाहणी’झालेली आहे.
बैठकीपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली. या इमारतीचे लवकरात लवकर व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here