आमदार रोहित पवारांच्या ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचा रथ गडचिरोली जिल्ह्यातून रवाना

0
234
जामखेड न्युज – – – 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वात ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावातून ग्रामपूजन करत यात्रेचा रथ रवाना करण्यात आला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा इथल्या किल्ल्यावर हा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकावला जाणार आहे. ‘आमच्या गावात आमचे सरकार’ चळवळीचे प्रणेते देवाजी तोफा यांच्या हस्ते ध्वज रवाना करण्यात आला.
कशी आहे ‘स्वराज्य ध्वज’ यात्रा?
हा भगवा ध्वज 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटरचा प्रवास करणार
देशातील 74 ऊर्जा स्थानांवर पोचणार स्वराज्य ध्वज
37 दिवस सलग प्रवास करत विजयादशमीच्या दिवशी सर्वात उंच भगवा ध्वज फडकाविला जाणार
74 मीटर उंची असलेला भगवा ध्वज 96 × 64 फूट आकाराचा तर वजन 90 किलो
संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या लेखा मेंढा (ता. धानोरा) या गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श गावात ‘स्वराज्य ध्वजा’ची पूजा करण्यात आली. या गावात ‘आमचं गाव आमचं सरकार’ ही संकल्पना राबवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्यासह त्यांचे सहकारी आणि ग्रामस्थांनी ध्वजाची पूजा केली.
भुईकोट किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखलं
निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावन भूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याच्या भुईकोट किल्ला… याच किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून रोहित पवार यांनी परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.
भगवा रंग कुणाचा नाही, तो मानवतेचा आणि एकतेचा
“भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचाच अभिमान, सर्वस्व आणि स्फूर्तिस्थान आहे. भगवा रंग हा कोणा एकाचा नव्हे तर तो सर्वांचा असून समानतेचा, एकीचा संदेश देणारा आहे. पाली वाङ्मयात अनेक ठिकाणी सर्वगुणसंपन्न गौतम बुध्दांना उद्देशून ‘भगवा’ शब्द आला आहे. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाने खांद्यावर जी पताका घेतली तीही भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली.”
जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज उभारण्याचा रोहित पवार यांचा संकल्प
“शीख धर्मामध्ये त्यागाचे आणि चैतन्याचे प्रतिक आहे भगवा रंग, पगडीचा सर्वसामान्य रंगही भगवाच, पिवळ्या रंगाची सावली जिला बसंती म्हणतात ती भगव्याचीच छटा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार 96X64 फूट असून वजन 90 किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे”, अस रोहित पवार यांनी
जामखेड न्युजशी बोलताना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here