Wednesday, November 25, 2026
Home शैक्षणिक बातम्या बालविवाहाला विरोध करा, बालकांवरील अत्याचार रोखा! ल. ना होशिंगमध्ये सुरक्षित बचपन अभियानातून...

बालविवाहाला विरोध करा, बालकांवरील अत्याचार रोखा! ल. ना होशिंगमध्ये सुरक्षित बचपन अभियानातून कायद्याचा जागर बालकांचे हक्क, शिक्षण आणि सुरक्षिततेचा संदेश, ‘तक्रार करा, बालपण सुरक्षित ठेवा, भविष्य उज्ज्वल करा’ – मान्यवरांचे आवाहन

0
2
बालविवाहाला विरोध करा, बालकांवरील अत्याचार रोखा! ल. ना होशिंगमध्ये सुरक्षित बचपन अभियानातून कायद्याचा जागर  बालकांचे हक्क, शिक्षण आणि सुरक्षिततेचा संदेश, ‘तक्रार करा, बालपण सुरक्षित ठेवा, भविष्य उज्ज्वल करा’ – मान्यवरांचे आवाहन

जामखेड न्युज – – – – – 

बालविवाहाला विरोध करा, बालकांवरील अत्याचार रोखा! ल. ना होशिंगमध्ये सुरक्षित बचपन अभियानातून कायद्याचा जागर

बालकांचे हक्क, शिक्षण आणि सुरक्षिततेचा संदेश, ‘तक्रार करा, बालपण सुरक्षित ठेवा, भविष्य उज्ज्वल करा’ – मान्यवरांचे आवाहन

बालविवाह, बालकांवरील अत्याचार आणि बालहक्कांच्या उल्लंघनाविरोधात समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती जामखेड व वकील संघ जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत ल. ना. होशिंग विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून बालकांचे हक्क, शिक्षण, सुरक्षितता, बालविवाह प्रतिबंध आणि अन्यायाविरोधात तक्रार करण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे होते. यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके, ॲड. महारूद्र नागरगोजे, सचिव ॲड. एस. ए. लटपटे, ढगे साहेब, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, सर्व अध्यापक बंधू-भगिनी आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

बालविवाहाला विरोध करा, बालकांवरील छळाची माहिती द्या!
ॲड. महारूद्र नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना बालविवाह हा बालकांच्या भविष्यावर घाला घालणारा गंभीर प्रश्न असल्याचे सांगितले. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास शासनाच्या संबंधित यंत्रणेला कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच एखाद्या बालकाचा कोणाकडून छळ होत असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल किंवा त्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असेल, तर अशा घटनांची माहिती संबंधित यंत्रणेला देणे आवश्यक आहे. बालकांचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘याच शाळेचा विद्यार्थी आज मार्गदर्शन करत आहे!’
ॲड. हर्षल डोके यांनी आपल्या मनोगतात विद्यालयातील विद्यार्थी जीवनाच्या आठवणींना उजाळा देत, “याच शाळेचा मी विद्यार्थी असून आज याच विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले.

प्रत्येक बालकाला सन्मानाने जगता आले पाहिजे. बालकांना वयाच्या १४ वर्षांपर्यंत शिक्षण मिळणे हा त्यांचा महत्त्वाचा हक्क आहे. बालपणात शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान मिळाला तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. बालकांवर अन्याय होत असेल, छळ होत असेल किंवा त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर त्यांनी आणि त्यांच्या आजूबाजूच्या नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे.“आपले बालपण सुरक्षित, तर आपले भविष्य सुरक्षित,” हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

हक्कांबाबत जागरूक राहा, कर्तव्यांचेही पालन करा!
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य बी. ए. पारखे यांनी बालकांचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला विविध हक्क प्रदान केले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे; मात्र त्याचबरोबर कर्तव्यांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शिक्षण, सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी या प्रत्येक बालकाच्या विकासासाठी आवश्यक बाबी आहेत. विद्यार्थ्यांनी अन्याय सहन न करता योग्य मार्गाने त्याविरोधात आवाज उठवावा आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल पायल गवळीचा गौरव
यावेळी राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करणाऱ्या पायल गवळी हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. तिच्या यशामागे मार्गदर्शन व मेहनतीचे योगदान असलेल्या शिक्षक राघवेंद्र धनलगडे यांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा गौरव सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी केले, तर पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी आभार मानले. बालविवाह, बालछळ आणि बालहक्कांच्या उल्लंघनाविरोधात जागरूकता निर्माण करून प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि शिक्षणसमृद्ध बालपण मिळावे, हा या जनजागृती शिबिराचा मुख्य संदेश ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!