रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश! कर्जत-जामखेडच्या १२ गावांत होणार प्रवासी निवारे, २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर! उन्हात-पावसात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांमध्ये उभारणार प्रवासी निवारे!
रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश! कर्जत-जामखेडच्या १२ गावांत होणार प्रवासी निवारे, २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर!
उन्हात-पावसात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा, कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांमध्ये उभारणार प्रवासी निवारे!
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मतदारसंघातील १२ गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यासाठी तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे. आमदार रोहित पवार यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना एसटी बसने प्रवास करणे हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थी, नोकरदार, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांना विविध कामांसाठी गावातून शहरात तसेच इतर ठिकाणी प्रवास करावा लागतो. मात्र, अनेक गावांमध्ये बसची वाट पाहण्यासाठी व्यवस्थित निवारा नसल्याने प्रवाशांना उन्हात आणि पावसात उभे राहावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात कडक ऊन आणि पावसाळ्यात पावसाचा मारा सहन करत बसची प्रतीक्षा करावी लागत होती.
ग्रामीण भागातील प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रवासी निवारे उभारण्याची मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत १२ गावांतील प्रवासी निवाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कर्जत आणि जामखेड तालुक्यातील या गावांचा समावेश या निधीतून कर्जत तालुक्यातील खेड, माही जळगाव, मांदळी, कोंभळी, रुईगव्हाण आणि कुळधरण या सहा गावांमध्ये प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहेत.
तर जामखेड तालुक्यातील साकत, राजुरी, चौंडी, हळगाव, जवळके आणि जवळा या सहा गावांमध्येही प्रवासी निवाऱ्यांची कामे केली जाणार आहेत. अशा प्रकारे कर्जत तालुक्यात सहा आणि जामखेड तालुक्यात सहा, अशा एकूण १२ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा या प्रवासी निवाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना बसची वाट पाहताना बसण्यासाठी आणि उन्हा-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
विशेषतः शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रवासीस्नेही करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता मंजूर निधीतून प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते आणि प्रवासी निवारे कधी पूर्ण होतात, याकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या मंजुरीबद्दल राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांचे कर्जत-जामखेडच्या नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.