१४ नोव्हेंबरपर्यंत पाणी द्या, अन्यथा १५ नोव्हेंबरला जामखेड बंद! राष्ट्रवादीचा प्रशासनाला अल्टिमेटम
हंडा मोर्चानंतरही मुख्याधिकाऱ्यांची ठोस कार्यवाही नाही, कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी-काँग्रेसची नाराजी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा!
जामखेड शहरासह सात वाड्या – वस्त्यांमधील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. हंडा मोर्चा नंतरही पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. २८ ऑक्टोबर रोजी काढलेल्या हंडा मोर्चानंतर पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील पाणीप्रश्न १४ नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावा, अन्यथा १५ नोव्हेंबर रोजी जामखेड शहर बंद ठेवण्यात येईल, असा इशारा कर्जत उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांना निवेदन देऊन देण्यात आला.
जामखेड शहरासह सात वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी नितीन पाटील यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
हंडा मोर्चानंतरही आश्वासनांची पूर्तता नाही!
जामखेड शहर आणि सात वाड्या-वस्त्यांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.
आंदोलनानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आश्वासन देऊनही परिस्थितीत बदल होत नसल्याने नागरिकांच्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे आता केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवावा शुक्रवारी, दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी नितीन पाटील पंचायत समिती येथे शासकीय बैठकीसाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जामखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करून शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, तसेच सात वाड्या-वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही प्राधान्याने सोडविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबरची मुदत; १५ नोव्हेंबरला बंदचा इशारा! पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना प्रशासनाने वेळकाढूपणा करू नये, अशी भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा १५ नोव्हेंबर रोजी जामखेड शहर बंद ठेवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या इशाऱ्यामुळे जामखेडमधील पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नगरपरिषद प्रशासन या मुदतीत कोणत्या उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास बोराटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष काका राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसिम सय्यद, माजिद कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, अर्चना राळेभात, संपत राळेभात, संदीप (आण्णा) गायकवाड, सचिन शिंदे, दादा महाडिक, हरिभाऊ आजबे, संदीप अडाले, बिलाल शेख, राजू शिंदे, अनिल रेडे, दीपक घायतडक, गणेश घायतडक, अक्षय पोकळे, प्रणव राळेभात, दत्तात्रय डिसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणार का? हा जामखेडकरांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असून, १४ नोव्हेंबरच्या मुदतीपूर्वी प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.