जामखेड न्युज – – – – –
देशभक्तीच्या जयघोषाने जामखेड दुमदुमले! राष्ट्रीय एकता दौडीत एनसीसी कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा जागर, एनसीसीसह विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला एकतेचा संदेश
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), १७ महाराष्ट्र बटालियन, अहिल्यानगर-जामखेड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय एकता दौड देशभक्तीच्या उत्साहात पार पडली. या दौडीत एनसीसी कॅडेट्स, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकता, अखंडता आणि बंधुभावाचा संदेश दिला. देशभक्तिपर घोषणांनी जामखेड शहरात राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रदीकुमार बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून दौडीला प्रारंभ झाला. भारतमातेचा जयघोष आणि देशभक्तिपर घोषणांसह शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दौड काढण्यात आली. यावेळी सर्व सहभागींच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.

या दौडीत जामखेड महाविद्यालय, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक, नागरिक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सरदार पटेलांच्या विचारांचा जागर
भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती यांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, तसेच देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्याचा संकल्प करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.




