राज्यात नेत्यांचा दबदबा, मतदारसंघात मात्र पाण्यासाठी टाहो! प्रा. राम शिंदे, रोहित पवार यांच्या मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावर हंडे, उजनी योजना रखडली, तलावांनी गाठला तळ!
राज्यात नेत्यांचा दबदबा, मतदारसंघात मात्र पाण्यासाठी टाहो!
प्रा. राम शिंदे, रोहित पवार यांच्या मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावर हंडे, उजनी योजना रखडली, तलावांनी गाठला तळ!
राज्याच्या राजकारणात वजन आणि दबदबा असलेले विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जामखेड शहरात १२ ते १५ दिवसांनी एकदा, तेही अवघा तासभर पाणी मिळत असल्याने महिलांचे हाल होत आहेत. भुतवडा, मोहरी आणि खैरी तलावांनी तळ गाठल्याने आगामी काळात पाणीपुरवठा कसा करायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उजनीच्या पाणीपुरवठा योजनेची चर्चा निवडणुकीच्या काळात जोर धरते; मात्र प्रत्यक्षात योजना पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांना आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तलावांतील पाणीसाठा कमी होत असताना टँकरसाठी पाणी आणायचे कुठून आणि आगामी आठ ते दहा महिने नागरिकांची तहान कशी भागवायची, याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
राज्याच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व असलेल्या मतदारसंघातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटूनही नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती?
उजनीच्या पाणी योजनेचा गाजावाजा, प्रत्यक्षात प्रतीक्षाच! जामखेड शहर आणि परिसरातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उजनीच्या पाणीपुरवठा योजनेची चर्चा वारंवार केली जाते. निवडणुकीच्या काळात ही योजना कळीचा मुद्दा ठरते. नागरिकांनाही या योजनेमुळे पाणीटंचाई कायमची दूर होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात योजनेचे काम पूर्ण होऊन नागरिकांच्या नळाला नियमित पाणी कधी येणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. सध्याच्या परिस्थितीत या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळातही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे.
आता आश्वासनांपेक्षा ठोस कृतीची गरज आहे. उजनी योजनेला गती देणे, टँकरचे नियोजन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, यावर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडे कधी उतरणार आणि जामखेडकरांना नियमित पाणी कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.