Wednesday, October 28, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट! १० ते १२ दिवसांनी पाणी, महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर हंडा...

जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट! १० ते १२ दिवसांनी पाणी, महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर हंडा मोर्चा! आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन, दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

0
2
जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट! १० ते १२ दिवसांनी पाणी, महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर हंडा मोर्चा!   आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन, दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये पाण्याचा ठणठणाट! १० ते १२ दिवसांनी पाणी, महाविकास आघाडीचा नगरपरिषदेवर हंडा मोर्चा!

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन, दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

जामखेड शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी वणवण सुरू आहे. महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या वतीने जामखेड नगरपरिषदेवर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला. हातात हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिला भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

१० ते १२ दिवसांनी पाणी; महिलांचा संताप अनावर!
जामखेड शहरात सध्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरगुती वापरासाठी पाणी उपलब्ध करून घेणेही कठीण होत असून, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात महिला भगिनींनी हातात हंडे घेऊन सहभाग नोंदवला. पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, शहरात दर पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा करावा आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार?
जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दहीगाव ते जामखेड पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. या योजनेत शहरातील सात वाड्या-वस्त्यांचा समावेश असून, योजना पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, काम अपूर्ण असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा निश्चित करून पुढील कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योजनेच्या कामाची सद्यस्थिती स्पष्ट करावी, काम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी आणि आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट!
राज्यात अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असताना जामखेड शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अजून हिवाळा आणि त्यानंतरचा उन्हाळा बाकी असताना शहरात आतापासूनच पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे वेळीच नियोजन केले नाही, तर आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर सुनिश्चित करावा, पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करावे आणि दहीगाव-जामखेड योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मोर्चात महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग
या हंडा मोर्चावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहाजी राळेभात, युवक अध्यक्ष प्रशांत राळेभात, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक वसीम सय्यद, नगरसेवक राजेंद्र गोरे, नगरसेविका प्रीती प्रशांत राळेभात, नगरसेविका हिना इस्माईल सय्यद, नगरसेविका मेहरुणीसा शफी कुरेशी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. मयुर डोके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा, प्रहारचे तालुकाध्यक्ष नयुम सभेदार, पोले नाना, कल्लू चाचा, रमेश आजबे, मंगेश आजबे, अर्चना संपत राळेभात, अनुराधा अडाले, बजरंग डूचे, माजीत कुरेशी, मनोज राळेभात, प्रकाश काळे, शरद शिंदे, महेंद्र राळेभात, रामहरी गोपाळघरे, दादाराजे भोसले, बिभिषण परकड, कांतिलाल वाळूजकर, अमर चाऊस, रावसाहेब जाधव, वसीम शेख, हरिभाऊ आजबे, संदीप गायकवाड, अण्णा मोरे, संदीप अडाले आणि दादा महाडिक यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन आता तरी जागे होणार का?
जामखेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, नियमित पाणीपुरवठा सुरू करावा आणि दहीगाव-जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि जामखेडकरांना पाणीटंचाईतून दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!