जामखेडमध्ये पाणीटंचाईचा भीषण वणवा! २१ हजार नागरिकांची तहान १६ टँकरवर, कुकडीचे पाणी आणण्याचा दोन्ही आमदारांना विसर? सरासरीच्या निम्माच पाऊस; १४ गावे, ३१ वाड्यावस्त्यांमध्ये पाणी संकट गंभीर, पुढील आठ ते नऊ महिने टंचाईची भीती!
जामखेडमध्ये पाणीटंचाईचा भीषण वणवा! २१ हजार नागरिकांची तहान १६ टँकरवर, कुकडीचे पाणी आणण्याचा दोन्ही आमदारांना विसर?
सरासरीच्या निम्माच पाऊस; १४ गावे, ३१ वाड्यावस्त्यांमध्ये पाणी संकट गंभीर, पुढील आठ ते नऊ महिने टंचाईची भीती!
अपुऱ्या पावसामुळे जामखेड तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून, हिवाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यातील १४ गावे आणि ३१ वाड्यावस्त्यांमधील २१ हजार ८३० नागरिकांची तहान भागविण्यासाठी सध्या १६ टँकर सुरू आहेत. वाघा गावासाठीही टँकरचा प्रस्ताव दाखल झाल्याने टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
जामखेड तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे ४६५ मिलिमीटर आहे. यंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाल्याने नदी-नाले, तलाव आणि जलसाठे कोरडे पडले आहेत. जूनमध्ये खुरदैठण येथे एका टँकरने सुरू झालेला पाणीपुरवठा आता १६ टँकरपर्यंत पोहोचला आहे. रत्नापूर आणि सातेफळ येथील पाण्याच्या उद्भवांतून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
पावसाअभावी खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असतानाच आनंदवाडी येथे पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे पाणीटंचाईचे गांभीर्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.
कुकडीचे पाणी आणणार कोण? दोन्ही आमदारांकडे नागरिकांचे लक्ष! यापूर्वी आमदार राम शिंदे यांच्या कार्यकाळात तसेच २०१९ मध्ये आमदार रोहित पवार यांच्या कार्यकाळात चोंडी आणि जवळा बंधाऱ्यांपर्यंत पिण्यासाठी ३५० दशलक्ष घनफूट कुकडीचे पाणी आणण्यात आले होते.
सध्या हजारो नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असताना, चोंडी आणि जवळा बंधाऱ्यांत कुकडीचे पाणी आणण्यासाठी ठोस पाठपुरावा सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही आमदारांनी पाणीटंचाईचा आढावा घेण्याबरोबरच कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी शासनदरबारी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती नागरिकांना देण्याची गरज आहे. पुढील आठ ते नऊ महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने टँकरपुरते नियोजन न करता जलसाठ्यांचे पुनर्भरण आणि पर्यायी पाणीस्रोत उपलब्ध करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.