क्रीडांगणावर खेळाडू घडवणारे, वर्गात ज्ञानाचे धडे देणारे राजेंद्र उदावंत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार! क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेंद्र उदावंत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!
क्रीडांगणावर खेळाडू घडवणारे, वर्गात ज्ञानाचे धडे देणारे राजेंद्र उदावंत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार!
क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राजेंद्र उदावंत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातही गुणवंत खेळाडू निर्माण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे, अशा विविधांगी कार्याची दखल घेत श्री भैरवनाथ विद्यालय, हाळगाव येथील शिक्षक श्री. राजेंद्र किसन उदावंत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथील Swift N Lift संस्थेच्या वतीने 10 आक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा. श्री. संजयजी शिरसाट यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजेंद्र उदावंत यांनी १ सप्टेंबर २००६ रोजी श्री भैरवनाथ विद्यालय, हाळगाव येथे सेवेत रुजू झाल्यानंतर अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मराठी विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड, अभिव्यक्ती कौशल्य आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धांमध्ये तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्तरावर बक्षिसे मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली आहे.
क्रीडा क्षेत्रात खेळाडू घडविण्याचे सातत्यपूर्ण कार्य शिक्षक म्हणून कार्य करताना उदावंत यांनी क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्राधान्य दिले. सन २००६ पासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडागुणांना योग्य दिशा देऊन त्यांना मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर व राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंना दरवर्षी वैयक्तिक वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिस देतात.
गेल्या वर्षी विद्यालयातील चि. सुजित करगळ याची कुस्ती या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच कु. भाग्यश्री ढवळे हिचा अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा संघात समावेश झाला आणि तिने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या या यशातून उदावंत यांच्या क्रीडा मार्गदर्शनाची प्रचिती येते. माजी विद्यार्थिनीही घडली अधिकारी विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीची दिशा देण्याचे काम करताना उदावंत यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या माजी विद्यार्थिनी सौ. शितल पाचरणे या जामखेड येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर विविध क्षेत्रांत प्रगती करावी, हेच उदावंत यांच्या अध्यापन कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यासोबतच उदावंत सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतात. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, तसेच आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ नयेत, या भावनेतून त्यांचे हे कार्य सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांपासून ते जामखेड तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. या माध्यमातून तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते योगदान देत आहेत. राष्ट्रीय पुरस्कारामुळे कार्याचा गौरव शिक्षण, क्रीडा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे यश आणि सामाजिक बांधिलकी या विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेत राजेंद्र किसन उदावंत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसे हाळगाव ग्रामस्थ यांनी उदावंत यांचे अभिनंदन केले आहे. या सन्मानामुळे श्री भैरवनाथ विद्यालय, हाळगाव तसेच जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देत त्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाच्या कार्याचा हा गौरव असून, उदावंत यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.