जामखेड शहरातील महामार्गालगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडी, रस्त्याची अपुरी जागा आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत जामखेडकरांकडून सातत्याने आवाज उठविला जात होता. निवेदने, बैठका, प्रशासनाकडे पाठपुरावा तसेच आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्याने मांडण्यात आला. अखेर प्रशासनाने प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे.
महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर झालेले अतिक्रमण हे शहरातील वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याची नागरिकांची तक्रार होती. अतिक्रमणामुळे महामार्गाची उपलब्ध रुंदी कमी होऊन वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
प्रशासनाने अखेर या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम केवळ काही ठिकाणांपुरती मर्यादित न ठेवता नियमाप्रमाणे आणि निष्पक्षपणे सातत्याने राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
“जामखेड शहरातील महामार्गालगतच्या अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून जामखेडकरांच्या चर्चेचा आणि संघर्षाचा विषय होता. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा, निवेदने, बैठका आणि आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्यात आला. अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे,” असे त्यांनी सांगितले.
“ही कारवाई म्हणजे जामखेडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आहे. प्रशासनाने ही मोहीम निष्पक्षपणे आणि सातत्याने पुढे नेत महामार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलावीत,” अशी अपेक्षाही अवधूत पवार यांनी व्यक्त केली.
अतिक्रमण हटविल्यानंतर महामार्गाची वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, पुढील काळात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.