जामखेड शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले असून, उद्यापासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तब्बल ५० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जामखेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः अतिक्रमणामुळे गेल्या तीन वर्षांपासून महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. अनेक आंदोलने उपोषण पण यासाठी झाले होते.
यापूर्वी प्रशासनाकडून काही ठिकाणी टपऱ्या व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली होती. आता त्यापुढे जाऊन पक्क्या बांधकामांवरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून कारवाईची पूर्वसूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, अतिक्रमणाच्या कारवाईविरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत संबंधित प्रकरणांमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या उद्याच्या कारवाईकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कारवाईला विरोध झाल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली असून, उद्यापासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
महामार्गाचे रखडलेले काम, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न यामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांचे या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. अनेक दिवसांपासून नागरिक ज्या कारवाईची वाट पाहत होते, ती अखेर प्रत्यक्षात येणार असल्याने शहरातील वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता प्रशासनाची ही मोहीम किती प्रभावीपणे राबविली जाते आणि महामार्गाचा रखडलेला मार्ग प्रत्यक्षात किती लवकर मोकळा होतो, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.