जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारच्या आठवडे बाजारात पशुधनाच्या खरेदी-विक्रीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले. शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या बाजारात एका बैलाला तब्बल १ लाख ७१ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे जामखेडच्या पशुधन बाजारातील वाढती मागणी आणि पशुधनाच्या दर्जाला मिळणारे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
गितेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड येथील संतोष फुंदे यांनी हा बैल १ लाख ७१ हजार रुपये किमतीला खरेदी केला. तर रायमोहा, ता. पाटोदा, जि. बीड येथील अल्ताफ पठाण यांनी या बैलाची विक्री केली. बैलाला मिळालेल्या या मोठ्या भावाची बाजार परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
सीमावर्ती भागातील मोठे पशुधन केंद्र जामखेडचा शनिवारचा आठवडे बाजार हा परिसरातील महत्त्वाच्या पशुधन बाजारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. जामखेड हे बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागाच्या जवळ असल्याने विविध जिल्ह्यांमधून शेतकरी, पशुपालक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.
सांगोला, पंढरपूर, सांगली तसेच बीड, धाराशिव आदी भागांतून बैल, गायी आणि अन्य जनावरांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्याचबरोबर शेळी-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीसाठीही बाजारात मोठी उलाढाल होताना दिसते.
कर्नाटकातील व्यापाऱ्यांचीही जामखेडला पसंती जामखेडच्या पशुधन बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटक राज्यातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येतात. विशेषतः शेळी व्यापारासाठी कर्नाटकातील व्यापाऱ्यांची बाजारात उपस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे जामखेडच्या आठवडे बाजाराचा व्याप केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता आंतरजिल्हा आणि आंतरराज्य पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र आहे.
पशुधनाचा दर्जा, त्यानुसार मिळणारा भाव, विविध जिल्ह्यांतून होणारी आवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहणारे व्यापारी यामुळे जामखेडच्या पशुधन बाजाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
१.७१ लाखांच्या बैलाने पुन्हा मिळवून दिली बाजाराची चर्चा दर शनिवारी भरणाऱ्या या बाजारात पशुधनाच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. आज एका बैलाला मिळालेल्या १ लाख ७१ हजार रुपयांच्या भावामुळे जामखेडच्या पशुधन बाजाराची पुन्हा एकदा जिल्हाभरात चर्चा झाली आहे. दर्जेदार पशुधनाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांसाठी हा बाजार महत्त्वाचा ठरत आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, उपसभापती नंदकुमार गोरे, सचिव दिलीप तिजोरे यांच्यासह शेतकरी, पशुपालक, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.