जामखेड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे, सातत्याने आणि गुणवत्तापूर्ण सेवा बजावणारे शाखा अभियंता विठ्ठल भोजू माने यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग श्रीरामपूर येथे उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीनिमित्त जामखेड येथे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचा निरोप व सत्कार समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता किरण साळवे होते. यावेळी बोलताना साळवे म्हणाले की, विठ्ठल माने यांनी शासकीय सेवेत काम करताना केवळ आपले कर्तव्य पार पाडले नाही, तर आपल्या कार्यातून असंख्य माणसे जोडली. कामातील सातत्य, गुणवत्तेची जाणीव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळेच माने यांनी यश संपादन केले असून, त्यांची पदोन्नती ही त्यांच्या कार्याची पावती आहे, असे त्यांनी सांगितले.
माने यांच्या निरोपानिमित्त पंचायत समिती परिसरातून हलगी-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सहकाऱ्यांनी, मित्रपरिवाराने आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत माने यांना शुभेच्छा दिल्या. अनेक वर्षे जामखेडमध्ये सेवा बजावलेल्या सहकाऱ्याला निरोप देताना उपस्थितांच्या भावना दाटून आल्या.
किरण साळवे पुढे म्हणाले की, “जीवनात आपल्या सोबत कोण येत असते, हे वेळ ठरवत असते; मात्र आपल्या सोबत कोण टिकून राहणार, हे आपल्या व्यवहारातून ठरत असते. आज या कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहता माने यांनी आपल्या सेवाकाळात केवळ शासकीय काम केले नाही, तर मोठ्या प्रमाणात माणसेही कमावली आहेत.”
कर्जत-जामखेडसारख्या तालुक्यात शासकीय कामकाज करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत माने यांनी उत्कृष्ट कार्यपद्धतीने काम करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या कामातील सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून, पदोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची योग्य दखल घेण्यात आली असल्याचे साळवे यांनी नमूद केले.
‘पैसा-सौंदर्य संपते; माणसाच्या हृदयातील स्थान कायम राहते’ सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त उपविभागीय अभियंता विठ्ठल भोजू माने भावूक झाले. शासकीय सेवेत काम करताना नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
“गेल्या सत्तावीस वर्षांच्या सेवाकाळात अनेक माणसांशी आपुलकीचे संबंध निर्माण झाले. जामखेडकरांनी मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले. त्यामुळेच पंचायत समितीत सहा वर्षे यशस्वीपणे काम करता आले. पैसा आणि सौंदर्य काळानुसार संपते; मात्र माणसाच्या हृदयात निर्माण केलेले स्थान कधीही संपत नाही. शासकीय सेवेत असताना प्रामाणिकपणे माणसे जोडण्याचे काम केले आणि आजच्या कार्यक्रमातील उपस्थिती ही त्या नात्याची पावती आहे,” असे भावनिक उद्गार माने यांनी काढले.
या कार्यक्रमाला माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, अजय काशिद, बापूराव ढवळे, उपअभियंता किरण साळवे, चव्हाण साहेब, सुनील साळुंके, अनिल पुरी, शशिकांत सुतार, सामाजिक कार्यकर्ते मंगेश आजबे, सरपंच प्रविण पोते, सरपंच महारूद्र महारनवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक तालुका अध्यक्ष शरद शिंदे, माजी सरपंच बापुसाहेब कार्ले, डॉ. कैलास हजारे, ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत सातपुते, भाजपा महिला तालुका अध्यक्ष रुपाली गर्जे यांच्यासह कर्जत-जामखेड पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, रोजगार सेवक, संगणक परिचालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठ्ठल माने यांनी शासकीय सेवेत अधिकारी-कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांच्या पदोन्नतीचा आनंद व्यक्त करत असतानाच त्यांना निरोप देताना अनेक सहकारी आणि नागरिक भावूक झाले. हलगी-ताशांच्या गजरातील मिरवणूक, मान्यवरांचा सत्कार आणि सहकाऱ्यांच्या भावनिक शुभेच्छा यामुळे माने यांचा निरोप समारंभ दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.