जामखेडची पंचमी अन् घुंगरांच्या तालावर रंगलेला उत्सव
भारत देश म्हणजे सणावारांचा देश. विविध धर्म, विविध जाती, विविध प्रांत यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. काही सणावारांना त्या-त्या शहरांच्या नावानेही ओळख मिळाली आहे. जसे मुंबईची दिवाळी, पुण्याचा गणेशोत्सव, अ. नगरचे मोहरम आणि जामखेडची नागपंचमी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जामखेडची पंचमी म्हटलं की लोकांच्या कानांत घुंगराचा आवाज घुमायला लागतो.
चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेले चा जामखेड हे तालुक्याचे गाव. या गावामध्ये सर्वच सण उत्साहाने साजरे केले जातात. परंतु पंचमी हा सण म्हणजे जामखेडमधील एकात्मतेचे प्रतिक आहे. कारण हा सण जामखेडमधील सर्व जाती-धर्माचे लोकं अगदी आनंदात व उत्साहात साजरे करतात. मोठमोठे राक्षसी पाळणे, जीवावर उदार होऊन दाखविला जाणारा सर्वांचा आवडता शो म्हणजे मौत का कुँवा होय.
त्याशिवाय गाढवाचा पन्नालाल शो, फिरती चक्री, लहान पाळणे, अनेक खेळण्यांची दुकाने, महिलांसाठी शृंगारिक साधनाची दुकाने असेच बरेच काही पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी झालेली असते. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत, स्त्रिया, मुली सर्वजण अगदी मनसोक्तपणे आनंद लुटत असतात. अशा प्रकारची जत्रा जवळ-जवळ आठ ते दहा दिवस न थांबता चालुचं असते. हा आनंद लुटण्यासाठी जामखेडच्या चोहोबाजूंनी लोक दररोज येत असतात. खेड्यापाड्यातील लोकं तर सहकुटुंब येत असतात. दूरदूरचे लोकं चार चाकी वाहने घेऊन येतात.
जामखेडची पंचमी महाराष्ट्रात प्रसिद्ध असण्याचे महत्त्वाचे कारण महणजे पंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा ‘सकृबा’ हा होय. या दिवशी जामखेडच्या प्रत्येक गल्लीमध्ये एक नृत्यासाठी स्टेज उभारलेले असते. त्या नृत्याचा कार्यक्रम पाहणाऱ्यांमध्ये काहीजण या नर्तींच्या कलेची कदर करणारे असतात. ते या नर्तकींना बिदागी म्हणून पैशांच्या स्वरुपात बक्षिसी देतात. हा नृत्याचा कार्यक्रम रात्री सुरू झाला की कधी सकाळ होऊन जाते, हे कळतसुद्धा नाही.
सकाळी १० वाजता सगळ्या जामखेडमधील नर्तिका नाचत नाचत पोलिस परेड ग्राऊंडवर येतात. मग त्याठिकाणी सर्वांचा ‘सामना’ होतो. त्याठिकाणी सर्वोत्कृष्ट नर्तिकांच्या पथकाला त्यावर्षीचा मानकरी ठरवले जाते. स्टेजवर रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट असतो. एकदा रात्रीचे ९ वाजले की हा नृत्यचा कार्यक्रम सुरू होतो. लोकांच्या झुंडी मग जामखेडच्या गल्लीबोळातून फिरायला लागतात. सगळे रस्ते नुसते माणसांनी भरून गेलेले असतात. या प्रेक्षकांपैकी ६० ते ७० टक्के शौकिन नशेत तर्रर्र असतात. नर्तकींचे नृत्य सुरु झाले हे प्रेक्षकही रस्त्यांवरच बेभान नाचतात. शिट्ट्या आणि विविध आवाज काढत ते नृत्यांगणांचा उत्साह वाढवितात. घुंगराचा आवाज, शिट्ट्या, प्रेक्षकांचे ओरडणे अशा आवाजने संपूर्ण जामखेड दुमदुमून जाते.
फार वर्षापासूनचा अनुभव आहे की, जामखेडच्या पंचमीत ‘घुंगरू’ वाजले की पाऊस अगदी पळत येतो. गेलेला पाऊसही परत येतो. परंतु काही लोकं याला अंधश्रद्धाही म्हणतात. जामखेडच्या पंचमीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. नाचणाऱ्या नर्तकींचा पंचमी म्हणजे पैसे कमावण्याचा मौसम असतो. एकदा पंचमीच्या घुंगराचा आवाजाचा आस्वाद कानांना आला की तो न चुकता पुढच्या वर्षी पंचमीचा आस्वाद घेण्यासाठी आला नाही तर नवलचं.
चौकट तमाशा संपले, उरली कलाकेंद्र…
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तमाशा हे करमणुकीचं मुख्य केंद्र होतं. शनिवारचा आठवडे बाजार आटोपला की तमाशा पहायला जायचं, हा अनेकांचा ठरलेला कार्यक्रम असायचा. विठा भाऊ मांग, कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांचं लोकनाट्य हे तर रसिकांचं मोठं आकर्षण असायचं. मागील चार दशकांत तमाशांना ओहोटी लागून कलाकेंद्रांची संख्या वाढली. जामखेड परिसरात दहा कलाकेंद्र आहेत. दिवाणखान्यातील बैठक आणि त्याच्या जोडीला थिएटरमध्ये नृत्य अशी परंपरा सुरू झाली. नाटक, सिनेमासारखं रितसर तिकीट काढून मंडळी तिथल्या थिएटरमध्ये बसून नृत्याचा आनंद घेऊ शकतात.