Saturday, September 5, 2026
Home ताज्या बातम्या पंढरीची वारी ही सामाजिक ऐक्याची शाळा – सभापती प्रा. राम शिंदे ...

पंढरीची वारी ही सामाजिक ऐक्याची शाळा – सभापती प्रा. राम शिंदे खर्ड्यात विठ्ठलमय वातावरण राम हवेलीत पादुकांचे दर्शन

0
51

जामखेड न्युज – – – – – – 

पंढरीची वारी ही सामाजिक ऐक्याची शाळा – सभापती प्रा. राम शिंदे

खर्ड्यात विठ्ठलमय वातावरण राम हवेलीत पादुकांचे दर्शन 

“पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती सामाजिक ऐक्य, साधेपणा, संस्कार आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणारी महाराष्ट्राची महान परंपरा आहे. या वारीमुळे जाती-पंथ, लहान-मोठा हा भेद विसरून समाजात एकात्मतेची भावना अधिक दृढ होते,” असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत शिरोमणी एकनाथ महाराज पालखीचे खर्डा येथे काल संध्याकाळी आगमन झाले. पालखीचे गावातील नागरिकांनी ढोल-ताशा आणि भगव्या पताकांसह उत्साहात स्वागत केले.

राम हवेलीत भावपूर्ण दर्शन
आज सकाळी राम हवेली मंदिर, मेन रोड, खर्डा येथे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि राज्यातील शेतकरी, महिला व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पैठण येथील एकनाथ महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

सभापती म्हणाले, “संत एकनाथ महाराजांची ही पालखी शांतता, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. अशा संतांच्या विचारांनीच आपला महाराष्ट्र घडला आहे.”

विठूनामाच्या गजरात प्रस्थान
दुपारी ठीक 12 वाजता “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय हरी विठ्ठल” च्या नामघोषात आणि मृदंगाच्या ठेक्यात पालखीचे खर्डा येथून पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.

हजारो वारकरी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या दिंडीत सहभागी झाले होते. संपूर्ण खर्डा गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.

यावेळी गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस प्रशासन आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!