ल. ना. होशिंग विद्यालयात पालक-शिक्षक संघ सभा उत्साहात संपन्न;
अरुण हेंद्रे यांची उपाध्यक्षपदी निवड
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाची वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेत पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यावेळी अरुण हेंद्रे यांची पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख तसेच माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अरुण हेंद्रे, डॉ. कैलास हजारे, ज्येष्ठ शिक्षक बबन राठोड, पोपट जगदाळे, वंदना आल्हाट, विजय कुलकर्णी, विजय काशिद, राळेभात यांच्यासह सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पोपट जगदाळे यांनी पालक-शिक्षक संघाची भूमिका, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती यांची सविस्तर माहिती देत संघाच्या माध्यमातून शाळा व पालक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
यावेळी कैलास वराट यांनी शालेय शिस्त, विद्यार्थ्यांचे चारित्र्य संवर्धन आणि पालकांच्या जबाबदारीबाबत मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घर आणि शाळा यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणतज्ज्ञ अ. ल. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या गुणवत्ता विकास प्रकल्पाची माहिती घाडगे मॅडम यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट ५०’ बॅच, अतिरिक्त तासिका, विविध विषयांवरील मान्यवरांची व्याख्याने, गुणवत्तावाढ उपक्रम आणि अभ्यासातील सातत्य याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर हनुमंत वराट यांनी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, एनएमएसएस (NMMS) परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी शाळेमार्फत करण्यात येणारी विशेष तयारी, अतिरिक्त तासिका आणि मार्गदर्शन वर्गांची माहिती पालकांना दिली.
उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी मागील वर्षीच्या दहावी व बारावीच्या निकालाचा आढावा घेत शाळेच्या शैक्षणिक यशाची माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध शालेय उपक्रम, सांस्कृतिक, क्रीडा आणि स्पर्धात्मक कार्यक्रम यांचीही माहिती त्यांनी पालकांसमोर मांडली.
पालकांच्या वतीने सचिन देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी घरीही नियमित लक्ष देऊन शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. कैलास हजारे यांनी आपल्या प्रेरणादायी मनोगतातून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बळावर शाळेचा नावलौकिक अधिक उंचावावा, असे सांगत विविध उदाहरणांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष अरुण हेंद्रे यांनी गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे स्वागत करत, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक-शिक्षक संघ कायम शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घायतडक मॅडम व सुपेकर मॅडम यांनी केले, तर पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी उपस्थितांचे आभार मानले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शाळेने मांडलेले गुणवत्तावाढीचे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-शिक्षकांनी व्यक्त केलेली बांधिलकी यामुळे हा पालक-शिक्षक संघ मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.