सावरगांव हादरले : एकाच रात्रीत ६ ठिकाणी घरफोड्या, दीड लाखांचा ऐवज लंपास
सावरगांव, ता. जामखेड: येथे बुधवारी मध्यरात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमुख घटना : १ तोळे सोने व १.२ लाख रोख लंपास
१. विश्वनाथ किसन सपकाळ यांचे घर : चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे ही रक्कम बियाणे-खते खरेदीसाठी व जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जमा करून ठेवलेली होती. शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे पैसे गेल्याने सपकाळ कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
२. संदीप चिंचकर यांचे घर : येथून चोरट्यांनी ५ ग्रॅम सोने व १५ हजार रुपये रोख असा ऐवज रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला
३. कांताबाई आण्णा भांबे यांचे घर ४. शिवाजी आश्रु समुद्र यांचे घर या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी दाराचे कोंडे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लोकांना जाग आल्याने व काही हाती न लागल्याने चोरट्यांनी पळ काढला.
याशिवाय गावातील इतर दोन ठिकाणीही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
पोलिस तपास सुरू, ग्रामस्थांत संताप
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, “चोरट्यांची टोळी ४ ते ५ जणांची असावी. रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली आहे. लवकरच आरोपी जेरबंद करू.”
एका रात्रीत सहा ठिकाणी चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “पोलिसांची रात्रगस्त कुठे होती? खरीप तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पैसे गेले, आता पेरणी कशी करायची?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत.
सावरगांवचे सरपंच यांनी तातडीने ग्रामसभेचे आयोजन करून गावात रात्रगस्तीसाठी तरुणांचे पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
जामखेड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयित व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास तात्काळ ११२ किंवा जामखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. रात्री मौल्यवान वस्तू व रोख रक्कम घरात ठेवू नये.