परवाना घेऊनच शेतीमाल खरेदी-विक्री करावी – सभापती शरद कार्ले
विनापरवाना व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही
शेतीमाल व्यापारात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. विनापरवाना व्यवहारांमुळे बाजार व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे सर्व व्यापारी आणि संस्थांनी नियमानुसार परवाना घेऊनच व्यवहार करावेत. असे आवाहन सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.
दरम्यान, पणन विभागाने स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या परिपत्रकाची प्रती राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा उपनिबंधक तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांना पाठविण्यात आल्या आहेत.
विनापरवाना शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहारांवर पणन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही वैध परवान्याशिवाय शेतमाल व्यापार करणारे व्यापारी, संस्था, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,असे शासनाचे परिपत्रक आले असल्याचे सभापती कार्ले यांनी सांगितले.
शासनाने दहा वर्षांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानंतर कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, थेट पणन, खासगी बाजार, शेतकरी ग्राहक बाजारआणि ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसाठी परवाना घेणे आवश्यक करण्यात आले आहे.अशा परवानाधारकांकडून बाजार शुल्क आकारले जाणार नसले तरी परवाना घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यातआले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व आवाराबाहेर शेतीमालाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कृषी पणन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. शरद कार्ले यांनी दिला.
शेतकऱ्यांचे संरक्षण: “अनेकदा विनापरवाना व्यापारी गावोगावी फिरून शेतकऱ्यांचा माल कमी दरात खरेदी करतात. वजनात मारतात, रोख पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी परवाना सक्तीचा आहे.”
कायदेशीर बंधन: “महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 नुसार परवान्याशिवाय शेतीमाल खरेदी करणे गुन्हा आहे. 3 महिने कैद किंवा 5 हजार दंडाची तरतूद आहे.”
पारदर्शक व्यवहार: “परवानाधारक व्यापाऱ्यांना बाजार समितीत नोंद करावी लागते. ऑनलाइन पोर्टलवर दर जाहीर होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतो.”