शिंदे गटाचे शिवसेना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले गजाआड, दोन दिवसाची पोलीस कोठडी
गेल्या १० वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊनफरार असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाला अंभोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबूशेठ टायरवाले उर्फबाबू सुब्रमण्यम कांबळत असे या नेत्याचे नाव असून,२०१६ मध्ये एका पवन ऊर्जा प्रकल्पा वरील मजुरावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात तो मुख्य आरोपी होता.
आष्टी तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथील पवन ऊर्जा प्रकल्पावर काम करणारे मजूर अनिल प्रभाकर म्हस्के यांच्या पगारावरून २०१६ मध्ये वाद झाला होता. या वादातून बाबू कांबळत याच्यासह १२ जणांच्या टोळीने म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले होते. अंभोरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
मंगळवारी अंभोरा पोलिसांनी सापळा रचून कांबळतला अटक केली.त्याला आष्टी न्यायालयात हजर केलेअसता, न्यायालयाने त्याची गुन्ह्यातील पार्श्वभूमी विचारात घेऊन दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील इतर ११ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, पुराव्या अभावी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.परंतु,बाबू कांबळत हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. फरार असूनही त्याची राजकीय कारकीर्द सुरूच होती आणि तो शिवसेना शिंदे गटाचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता.
बाबूशेठ टायरवाले हे राजरोसपणे प्रचार सभा तसेच अहिल्यानगर बीड जिल्ह्यात राजरोसपणे फिरणारा आरोपी खरोखरच सापडत नव्हता का राजकीय वरदहस्त होता. सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना अभय दिले जात होते याचीच चर्चा सुरू आहे.