निवडणुकीत गल्लीबोळात पाण्याचे टँकर, आता दुष्काळात टँकर गायब! जामखेडकरांचा संतप्त सवाल – टँकर गेले कोणीकडे?
जामखेड शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, या पाणीटंचाईच्या काळात गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गल्लीबोळात फिरणारे आणि मोफत पाणीवाटप करणारे राजकीय नेत्यांचे टँकर आता कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी निवडणुकीचे वातावरण तापले असताना शहरातील विविध भागांत मोफत पाणीवाटप करणाऱ्या टँकरची मोठी रेलचेल होती. गल्लोगल्ली जाऊन नागरिकांना पाणी देण्याची चढाओढ सुरू होती. त्यावेळी अनेकांनी सामाजिक कार्याचा आव आणत पाणीवाटपाचे उपक्रम राबवले. मात्र, आज प्रत्यक्ष दुष्काळाचे संकट उभे राहिले असताना तेच टँकर आणि त्यावेळी पुढाकार घेणारे अनेक राजकीय चेहरे दिसेनासे झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
आज शहरातील नागरिक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करत आहेत. अनेक कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या काळात समाजसेवेचा उत्साह दाखवणाऱ्यांनी आता पुढे येऊन नागरिकांना मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात दिसणारी तत्परता संकटाच्या काळात का दिसत नाही, हा खरा प्रश्न आहे.
निवडणूक आली की समाजसेवा आणि संकट आले की शांतता? निवडणुकीच्या काळात मोफत पाणीवाटपासाठी पुढे येणारे टँकर दुष्काळात मात्र रस्त्यावर का दिसत नाहीत? समाजसेवा ही केवळ मतांच्या गणितापुरतीच मर्यादित आहे का? सामाजिक बांधिलकी असेल तर ती निवडणुकीपुरती न ठेवता जनतेच्या अडचणीच्या काळातही जपली पाहिजे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांमध्ये उपरोधिक चर्चा अशीही सुरू आहे की, सरकारने आता एखादी निवडणूक जाहीर करावी, म्हणजे तरी पाणीवाटपाचे टँकर पुन्हा गल्लीबोळात फिरू लागतील आणि समाजसेवेचा उत्साह पुन्हा जागा होईल! किमान त्यानिमित्ताने का होईना, नागरिकांना पाणी तरी मिळेल!
समाजसेवेचा खरा कस निवडणुकीत नाही, तर संकटाच्या काळात लागतो. जामखेडकरांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष पाण्याची गरज आहे. त्यामुळे राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर सध्याच्या भीषण पाणीटंचाईतही पुढाकार घेऊन मोफत पाणीवाटप सुरू करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता तरी राजकीय नेते पुढे येणार का? की पुढील निवडणुकीची वाट पाहणार? हा प्रश्न जामखेडकरांना पडला आहे.