जामखेड न्युज—–
केरोसीनला मंजुरी पण स्टोव्ह बाजारातून गायब
सरकारच्या निर्णयावर नागरिकांचा थेट सवाल !
आखाती भागात भडकलेल्या युद्धामुळे देशात गॅस टंचाई तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने पुन्हा एकदा केरोसिन (रॉकेल) वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर आता नागरिकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे स्टोव्हच नाहीत तर रॉकेल वापरायचे कसे? असा सवाल ते करीत आहेत. असे असले तरी कधी काळी या स्टोव्हचा वापर केलेल्यांच्या मनी मात्र स्टोव्हच्या सुखद आठवणी जागल्या आहेत.

पूर्वी घराघरांत केरोसिनवर चालणारे स्टोव्ह है स्वयंपाकघराचे अविभाज्य घटक होते. चहा बनवण्यापासून ते दैनंदिन स्वयंपाकापर्यंत स्टोव्हचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. हॉटेल खानावळीतही ते हमखास दिसत. घरात स्टोव्ह असणे तसेच लग्नात मुलीला तो देणे प्रतिष्ठेचे मानले जाई. शहरात शिकायला किंवा नोकरीसाठी गेलेल्या तरुणांचे स्वयंपाकही याच स्टोव्हवर होत असत.
पंपाने चालणारे, उभ्या-आडव्या टाकीचे, वातीचे स्टोव्ह असे त्यावेळी स्टोव्हचे विविध प्रकार होते. त्यांची दुरुस्ती करणारे फिरस्ते गावोगावी असत. नोजलमध्ये कचरा अडकला तर तो काढण्यासाठी लागणारी पिन, पंपासाठीचे वायसर, ग्रीस, हवा सोडण्या बंद करण्यासाठीची चावी अशा वस्तू किराणा दुकानातही उपलब्ध होत्या. शहरात तर स्टोव्ह निर्मिती अन् स्टोव्ह वापरासाठी लागणाऱ्या साहित्याचे कारखाने होते. यात मोठी उलाढाल होत होती. मात्र कालांतराने गॅस शेगड्या, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इंडक्शन कुकटॉप यांसारखे अत्याधुनिक पर्याय उपलब्ध झाल्याने स्टोव्ह हळूहळू कालबाह्य झाले.

केरोसिनमुळे होणारा धूर, वारंवार करावी लागणारी दुरुस्ती आणि किचकट वापर यामुळे लोकांनी गॅसला प्राधान्य दिले या पर्याय उपलब्धीमुळे सरकारनेही हळू हळू केरोसिन कपात केली व पुढे तर ती कायमची बंद केली परिणामी स्टोव्हचे उत्पादन बंद झाले आणि बाजारातून ते पूर्णतः गायब झाले. आजच्या पिढीला तर स्टोव्ह कसा होता व तो कसा वापरायचा हेही माहीत नाही.

आज शासनाने केरोसिन वितरण सुरू केले असले, तरी प्रत्यक्षात त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक साधनांचीच कमतरता असल्याने हा निर्णय कितपत परिणामकारक ठरेल, हा खरा प्रश्न आहे. खरे तर जुन्या उपाययोजना पुन्हा राबवताना बदललेल्या काळाची जाणीव ठेवणे आवश्यक असते मात्र शासन प्रशासनला त्याचा विसर पडल्याचे त्यांच्या केरोसिन वितरण निर्णयावरून दिसत आहे.

शासनाने केरोसीन देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित केली आहे. एकेकाळी लातूरसारख्या शहरात प्रत्येक भांडी दुकानात सहज मिळणारे स्टोव्ह आज पूर्णपणे दुर्मिळ झाले आहेत. गॅस शेगड्या आणि इंडक्शनसारख्या आधुनिक पर्यायांच्या वाढत्या वापरामुळे स्टोव्हची मागणी कमी होत गेली.





