जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
१० दिवसांत काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जामखेड तालुक्यातील जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या काही काळापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ताबडतोब रस्ता काम करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे. रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने विकास प्रक्रियेलाही अडथळा निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष प्रा. प्रशांत जालिंदर राळेभात यांच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित ठेकेदार व विभागाला तातडीने आदेश देऊन सदर रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, येत्या १० दिवसांच्या आत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास किंवा योग्य कार्यवाही करण्यात आली नाही, तर समस्त जामखेडकर नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. 8या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी व रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.