जामखेड प्रतिनिधी
पुढील निवडणुकांची दिशा ठरवण्यासाठी राजकीय पक्षांना महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडायला सध्या ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक पॅनेलचे उमेदवार निश्चित झाल्याने प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू झाला असून, सध्या ऐन थंडीत गावा-गावातील वातावरण गरम झाले आहे.
जामखेड तालुक्यातील सारोळा, आपटी, खुरदैठण, वाकी, पोतेवाडी, सोनेगाव, झिक्री, धोंडपारगाव, सातेफळ राजेवाडी या दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर काही ग्रामपंचायतींमधीलकाही प्रभाग बिनविरोध झाले आहेत.
एकुण 417 जागांपैकी 117 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 300 जागांसाठी 714 उमेदवार रिंगणात आहेत.
जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आॅनलाईन 1154 तर आॅफलाईन 148 असे एकुण 1302 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत 44 अर्ज अवैध झाले त्यामुळे 1258 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 427 जणांनी माघार घेतली तर 117 जागा बिनविरोध आल्याने आता 300 जागेसाठी 714 उमेदवार निवडून रिंगणात आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाचे पुढारी तालुकास्तरावरून भविष्यातील स्वतःच्या राजकीय सोयीसाठी जमेच्या बाजूने गावपातळीवरील सूत्र पडद्यामागून हलवत होते. आता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला असून, इथून पुढे पॅनल प्रमुख आणि उमेदवारांचा कस लागणार आहे. प्रत्यक्ष मतदानाला अजून काही कालावधी असला तरी, गाव पुढाऱ्यांनी स्वतःच्या पॅनलसाठी चा प्रचार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्या पासूनच चालवला आहे.
दिवस-रात्र पॅनल प्रमुख गावातील तसेच वाड्या, वस्त्यावरील लोकांच्या गाठी-भेटी घेत आहेत. एक गठ्ठा मतदान असणाऱ्या मोठ्या कुटुंबाची यादी काढून अशा कुटुंबाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना सदरील प्रभागातील उमेदवारांना देण्यात येत आहेत. काही प्रभागात बिनविरोध निवड झालेले उमेदवार आपलेच असल्याचे भासवण्यासाठी, दोन्ही पॅनेलमध्ये चढाओढ लागली आहे. त्यासाठी सामाजिक माध्यमावर बॅनरबाजीस उत आला आहे. काही हुशार मतदार ‘चोरी-चोरी, चुपके-चुपके’ दोन्ही बाजूला भेटून मी तुमचाचं! असे म्हणत स्वतःची पोळी भाजून घेत आहेत.
सर्वसाधारणपणे प्रत्येक गावात प्रमुख दोन पॅनल मध्येच लढती होत आहेत. मात्र, दोन्ही पॅनल कडून तिकिट न मिळालेली प्रबळ इच्छुक मंडळी नाराजांचा तिसरा पॅनल अथवा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीवेळी दिलेला दगा, परस्परांतील हेवे-दावे, भांडणे आदी गोष्टींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोके वर काढले आहे. परस्परविरोधी हेवे-दावे मिटवून, मतदारांची जुळवाजुळव करण्यात गाव पुढाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.
उमेदवार कोणती मते आपल्या हक्काची, कोणती विरोधकांची, कोणती बांदावरची? याची आकडेमोड करण्यात यात मग्न आहेत. तर गावातील लोक कोणता उमेदवार कसा?, कोण निवडून येऊ शकतो?, कोण पडू शकतो? याचा स्वतःच्या परीने अंदाज बांधत आहेत. सर्वोतरी प्रयत्न करून देखील दोन्ही बाजूने तिकिट न मिळालेले इच्छुक गावाच्या चौकात, वेशीवर दिवसभर खिन्न नजरेने पाहत एकटेच चकरा मारत आपण कोणाचेच नसल्याचे नाविलाजास्तव सांगत आहेत. दुसरीकडे गावातील तरुण मंडळी व्हाट्सअप, फेसबुक वर आपापल्या उमेदवारांची स्टेटस तसेच पोस्ट टाकून वातावरणात अजून रंगत आणत आहेत.
एकूणच काय तर, सध्या गावा-गावातील ‘ ग्रामपंचायतीची रणांगणे पेटली असून, त्यामुळे ऐन हिवाळ्यात ग्रामीण भाग ग्रामपंचायत निवडणुकामुळे तापले आहेत.