तरुणांनो.., राजकारण्यांच्या मागे पळू नका!!!

0
371
जामखेड न्युज – – – 
सध्याच्या तरुण पिढीला राजकारणाविषयी प्रचंड आकर्षण आहे. काही तरुण मुलं-मुली राजकारणाच्या आहारी गेली आहेत. राजकारणाविषयी आकर्षण असणे अजिबात वाईट गोष्ट नाही.घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिक्षित लोक जोपर्यंत राजकारणात येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अशिक्षित लोकांच्या हाताखाली काम करावे लागेल. आजही ही परिस्थिती बर्यापैकी टिकून आहे. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. म्हणजेच तरुण शिक्षित मुला- मुलींनी राजकारणाकडे वळायला पाहिजे. मात्र यामध्ये आपला फक्त वापर तर होत नाही ना? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. करिअर म्हणून तुम्ही निश्चित राजकारणात या, मात्र त्यापासून आपला काहीही फायदा होत नसेल आणि कार्यकर्ता म्हणून फक्त वापर होत असेल तर तुम्ही लगेच थांबला पाहिजे. नाहीतर पदरी निराशेशिवाय काहीही येणार नाही.आपण बऱ्याच वेळा पाहतो आमदार, खासदार, नगरसेवक,सरपंच यांच्या मागे-पुढे पळणारी बरीच तरुण मंडळी असते. साहेबांनी कोणतेही काम सांगितले की खिशातील पैसे खर्च करून काम करून देतात. सभांचे नियोजन करतात, नेत्यांपाई भांडण करतात,लोकांशी आणि नेत्याच्या विरोधकांशी पंगा घेतात. कोणतेही काम नसताना नेत्याबरोबर दिवस घालवतात. मात्र यातून हाती येतो तो भोपळ
नेत्यांना असते फुकट कार्यकर्त्यांची गरज!
कायम जवळ कार्यकर्ते असले की नेता शोभून दिसतो. नेत्याच्या मागे-पुढे दिवसभर लोकांची गर्दी असते. हे त्यांना यातून जनतेला दाखवून द्यायचे असते. त्यामुळे त्यांना कार्यकर्ते हवेच असतात.एखादया वेळी ते कार्यकर्त्याला जेऊ घालतात, कधी चहा पाणी तर बऱ्याच वेळा ” रंगीत- संगीत ” पार्टी देखील देतात. जेणेकरून आपला कार्यकर्ता खुश राहायला पाहिजे. आणि मध्य रात्री तो आपल्या फुकट कामाला यायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक नेता 20-30 जण पाळून असतो. जे भांडण- वाद विवाद घालू शकतात. यातून त्या नेत्याला योग्य ते साधायला मिळते. मात्र अशा गेम कार्यकर्त्यांनी आता ओळखायला शिकल पाहिजे.
साहेब मला डायरेक्ट फोन करतात.
नेत्यांची एक खासियत असते. कार्यकर्ता कसा हवेत ठेऊन स्वतःवर खुश ठेवायचा हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. आठवड्यातून किंवा महिन्यातून एखानदा फोन ते सहज कार्यकर्त्याला करतात. म्हणजे त्याला असे वाटायला पाहिजे की साहेब मला विसरले नाही, काही गोष्टीत माझ्याशिवाय पानं पण हलत नाही. वास्तविक असे काहीही नसते, हा खूप मोठा ” माईंड गेम ” असतो. आणि यामध्ये नेते यशस्वी होतात. कार्यकर्त्याला वाटते की साहेब मला डायरेक्ट फोन करतात आणि काम सांगतात किंवा माहिती विचारतात. म्हणजे मी साहेबांसाठी किती महत्वाचा माणूस आहे. पण मित्रांनो, असे अजिबात नसते. ही त्यांच्या कामाची आणि नांदी लावण्याची उत्तम पद्धत असते. त्यामुळे आपण समजून उमजून निर्णय घ्यावा.
पाळलेला कार्यकर्ता नाही तर नेता व्हा..
तुम्हाला जर राजकारणात करिअर करायचे असेल तर खुशाल करा. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र उगीच नेत्याच्या दारात बांधले जाऊ नका. राजकारणातील अंतिम ध्येय ठरवा आणि त्यानुसार कामाला लागा.निवडणूक लढवा, पडा, निवडून या, संघर्ष करा, भाषणाची सवय करा. मात्र नेत्याच्या मागे पुढे राहिल्याने तुम्हाला फक्त सतरंज्या आणि खुर्च्या उचलव्या लागतील.
मात्र सर्वच नेते तसे नाहीत
प्रत्येक नेता हा कार्यकर्त्यांचा वापरच करत नाही. तर काही नेते त्यांना मागे न फिरता कुठे तरी काम धंद्याला लावतात, स्वतःच्या पायावर उभे करतात. या नेत्यांना माहीत असतं की कार्यकर्ता भक्कम झाला तर मी भक्कम होईल. मात्र असे नेते खूप थोडे आहेत.
करिअरच वाटोळं
नेत्याच्या मागे-पुढे करून तुम्ही स्वतःच्या करिअर च वाटोळं करत आहात. आपला बहुमूल्य वेळ त्यांच्या सोबत घालून काहीही हाती लागत नाही. तुम्हाला कालांतराने असे लक्षात येईल की, आपण उगीच आपला वेळ वाया घातला. हातात तर काहीही लागले नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या जपून नादी लागावे. नाहीतर सारांश शून्य असेल, आणि तुमचा वेळ पण खर्च झालेला असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here