शरद पवार यांचा आवाज काढून मागितले पैसे!! 

0
226
जामखेड न्युज – – – 
 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून एकाने थेट मुख्यमंत्री कार्यलयात फोन केला होता. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवांना एका अधिका-याची ठरावीक ठिकाणी बदली करण्याचे फर्मान सोडले. पिंपरी चिंचवडमध्ये तर पवार यांचा आवाज काढून थेट पैशाचीच मागणी करण्यात आली. त्यामुळे पवारही आश्चर्यचकीत झाले. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे.
पवार आश्चर्यचकित
पवार अधिका-यांना कधीच फोन करीत नाहीत. असे असताना मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त सचिव सिंह यांनी थेट पवार यांनाच हा प्रकार सांगितला. त्यावर पवारही आश्चर्यचकीत झाले. चौकशीत हा बोगस कॉल असल्याचे उघड झाले. त्यानंतर गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एक व्यक्तीला ताब्यात ही घेण्यात आले आहे.
का आला संशय?
फोन करणा-याचा आवाज पवार यांच्यासारखाच असल्याने संबंधित अधिका-याने त्याचे म्हणणे ऐकून घेतले;  परंतु पवार स्वतः बदल्याबाबत फोन करत नाहीत. संबंधित व्यक्तीने मी सिल्व्हर ओक येथून बोलतो असे सांगितले. त्यामुळे अधिका-याला शंका आली.
अधिकारी थेट सिल्व्हर ओकवर
खात्री करून घेण्यासाठी एका अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून पवार यांची भेट घेतली. त्यांना हा सारा प्रकार कथन केला. पवार यांचा हुबेहूब आवाज काढून ती व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं उघड झाल; मात्र हा सर्व प्रकार खोटा होता. फसवणूक करणारा होता. यामुळे मग याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संशयित व्यक्ती ताब्यात
फोन मंत्रालयात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने कुठून फोन केला हे माहीत नव्हतं. तर फोन करण्यासाठी पवार यांच्या घरच्या नंबjसारखा नंबर वापरण्यात आला होता. यामुळे मग सिल्वर ओक येथील ऑपरेटरने तक्रार द्यायची ठरवले. गावदेवी पोलिस ठाण्यात आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या अॅपचा वापर करून सिल्वर ओक इथला नंबर बनवण्यात आला होता.
पवारांच्या आवाजात पैसे मागितल्याचा चाकणमध्ये गुन्हा
पवार यांचा आवाज काढून पैसे मागितल्याप्रकरणी तिघांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभरड (रा. कडाची वाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीसह त्यांची पत्नी व मेहुणा यांच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. फोनवर तसेच प्रत्यक्ष घरी येऊन व्याजाच्या पाच कोटी रुपयांची मागणी केली. ”पैसे नाही दिले तर, माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला संपवून टाकीन” अशी धमकी दिली. पवार यांचा आवाज काढून ‘धीरज पाठारे याचे पैसे देऊन टाक अन् प्रकरण संपवून टाक’ अशी धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here