जामखेडच्या रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरूच,दोन मोटरसायकल अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी
संजय कोठारींची जीव वाचवण्याची धडपड सुरूच
जामखेड तालुक्यातील नान्नज रोडवरील आय.टी.आय. जवळ मंगळवार दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात जामखेड येथील भारत घागरे यांचा डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर मृत्यू. तर त्यांची पत्नी सौ. शारदा घागरे जामखेड तसेच संजय गुळवे मु.पो.शेळगाव परंडा जिल्हा धाराशिव गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती शरद चव्हाण व तेजस मोहळकर यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच कोठारी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन महेंद्र शिरसागर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना दवाखान्यात दाखल केले परंतु भारत घागरे यांना जबर मार लागल्याने डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु डॉक्टरांना यश आले नाही.
तसेच भारत घागरे यांच्या पत्नी सौ सौ. शारदा घागरे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच समोरील गाडीवरील संजय गुळवे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी गाडी कंट्रोल न झाल्यामुळे घागरे यांच्या समोरच्या वाहनावर आदळली आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, जामखेड–आष्टी, जामखेड–कर्जत, जामखेड–नान्नज व जामखेड–खर्डा हे चारही प्रमुख मार्ग सध्या मोठमोठ्या खड्ड्यांनी विदीर्ण झाले असून वाहनचालकांना प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. केवळ मागील महिन्यातच या परिसरात १५ ते २० अपघात घडले असून अनेक जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जनतेत संताप आहे.
या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली असून पुढील तपास प्रवीण इंगळे (पोलीस नाईक) व सरोदे (पोलीस कॉन्स्टेबल) करीत आहेत.
“अपघात झाल्यानंतर घटनास्थळी लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात, मात्र मदत करण्याऐवजी फक्त गर्दी करतात. अशा वेळी ॲम्बुलन्स चालवणे व जखमींना दवाखान्यात नेणे धोकादायक ठरते. तरीसुद्धा प्राण वाचवणे हेच कर्तव्य मानून मी रुग्णवाहिकेसह धाव घेतो,” असे कोठारी यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी मागील अनेक वर्षांपासून अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पुरवण्यासाठी अविरत झटत आहेत. आजवर हजारो जखमींना त्यांनी वेळेत उपचार मिळवून दिले असून असंख्य जीव वाचवले आहेत. त्यांच्या या निस्वार्थी सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. रात्री पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरी यांनी घागरे यांचे शिवविच्छेदन करून दिले असता घा बाळेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले