तालुक्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकरी वर्ग पारंपरिक बैलपोळ्याच्या तयारीत मग्न झाला आहे. गावोगावी बैल सजविणे, रिंगण तयार करणे तसेच बैलजोड्यांच्या मिरवणुकीसाठी शेतकरी उत्साहाने सराव करताना दिसत आहेत.
बाजारपेठेत झूल, रंगीबेरंगी कपडे, पितळी गजरे आणि सजावटीची साहित्ये खरेदीसाठी जामखेड येथील मेन चौकात शेतकऱ्यांची जोरदार गर्दी आहे.
शेतकरी बांधवांसाठी बैलपोळा हा केवळ सण नसून त्यांच्या शेती संस्कृतीचा आत्मा आहे. बैलांना स्नान घालणे, रंगीबेरंगी कपडे, झूल व पितळी गजरे लावून त्यांचा साजशृंगार केला जातो. नंतर ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांच्या सुरात बैलजोड्यांची मिरवणूक काढली जाते.
यंदा पिकांना आलेला चांगला प्रतिसाद व पावसाचे समाधानकारक चित्र पाहता उत्साह अधिक वाढला आहे. गावातील युवक समित्याही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करत असून, या पारंपरिक सणामुळे गावात ऐक्य, आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैलपोळ्याच्या पारंपरिक वारशाला साजेसा जल्लोष करण्यासाठी जामखेड तालुक्यात तयारी जोरात सुरू असून सर्वत्र आनंदाचा माहोल आहे.
शुक्रवारी बैलपोळा सण साजरा होणार असल्याने आपल्या सर्जा राजासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची जामखेडच्या बाजारपेठेत लगभग सुरू आहे.