बरं केलत नामदार थोरात साहेब…! तुम्ही स्वतः हौशे – नवशे – गवशे कार्यकर्त्यांचे कान टोचले…!!

0
204
संगमनेर  प्रतिनिधी  ( राजा वराट  )
प्रसिद्धी लोलूप कार्यकर्त्यांनी शहराचे विद्रुपीकरण करणारे लावलेले भलेमोठे होर्डिंग, फ्लेक्स बोर्ड महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः काढायला लावून या कार्यकर्त्यांचे अक्षरशः कान टोचले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नामदार थोरातांनी कृतीतून केली कार्यकर्त्यांची कान टोचणी अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा महसूल मंत्री झाल्यानंतर संगमनेर मधील त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांच्यामध्ये चढाओढ सुरू झालेली आहे. तशी ही चढाओढ आधीपासूनच आहे. मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर या चढाओढीला जोर येतो. साहेबांच्या आम्ही किती जवळ आहोत, साहेबांवर आमचे किती प्रेम आहे आणि त्यांचेही आमच्यावर किती प्रेम आहे. हे दाखवण्याचा खटाटोप येनकेनप्रकारे सर्व मार्गांनी या कार्यकर्त्यांचा चालू असतो. अशा कार्यकर्त्यांमध्ये ठेकेदार, लाभार्थी, पदाधिकारी यांची संख्या मोठी असते. आर्थिक सबळ असलेले कार्यकर्ते थोड्या श्रीमंत पद्धतीने साहेबांच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र आपल्या पद्धतीने साहेबांची भेट घेऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात.
नामदार थोरात यांच्या अवतीभवती सध्या जो काही गोतावळा तयार झाला आहे तो पाहता दहा वर्षापूर्वी आणि आता असलेला हा गोतावळा यात फार फरक आहे. दहा वर्षांपूर्वी व त्या आधी थोरात यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते असत. आता मात्र लाभार्थ्यांचीच संख्या जास्त दिसून येते अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकां मधून नेहमीच ऐकायला मिळते. साहेबांच्या गाडीत बसण्यापासून ते फोटो काढण्यापर्यंत ही स्पर्धा सुरू असते. येनकेन मार्गाने साहेबांबरोबर फोटो काढून आपण साहेबांच्या किती जवळ आहोत याची चढाओढ नेहमीच पाहायला मिळते.
जुने काढलेले फोटो सोशल मीडियावर वाढदिवस व अभिनंदन निमित्त पुन्हा पुन्हा वापरून स्वतःची लाल करून घेण्याची पद्धत संगमनेरात मात्र जोरात फोफावली आहे. अशावेळी या गर्भश्रीमंत कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली जाते. त्यामध्ये शहराचे विद्रुपीकरण करणारे फ्लेक्स बोर्ड मात्र सर्वत्र चमकत असतात. हार फुले, फटाकडे, केक, श्रीफळ, शाली, फेटे याचा खर्च तर वेगळाच. तो दर आठवड्याला वेगवेगळ्या कारणांनी सुरूच असतो. या फ्लेक्स बोर्ड ची साईज देखील अक्षरशः पाहण्याजोगी असते. त्यातच संगमनेर शहरात नव्याने झालेल्या बसस्थानकासमोर मोकळी जागा मिळाल्याने अशा जाहिरातबाज पुढाऱ्यांना चमकोगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
याठिकाणी विविध, पुढारी, नेते तसेच स्वयंघोषित कार्यकर्ते, पदाधिकारी, पुढारी, नेते मोठ मोठाले बॅनर्स, फ्लेक्स लावून आपली जाहिरातबाजी करत असतात. नवीन बस स्थानक अक्षरशः जाहिरातबाजीचा अड्डाच झाले होते. मराठी जाहिरातीं बरोबर इंग्रजी जाहिरात सुद्धा झळकू लागल्या होत्या. याठिकाणी झळकलेल्या या तथाकथित नेत्यांचे, पुढाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सामाजिक योगदान मात्र काय आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. या सर्व व दिखाऊ बाबी थोरातांच्या लक्षात येत नव्हत्या असे नाही. मात्र योग्य संधी मिळत नव्हती. ही संधी गेली चार-पाच दिवसापूर्वी नामदार थोरात यांना अचानक मिळाली. नव्हे त्यांनी ती शोधली असेच म्हणावे लागेल.
मंत्री थोरात यांचा ताफा संगमनेरच्या बसस्थानका समोरून जात असताना भल्यामोठ्या होर्डिंग्जवर लावलेल्या जाहिराती पाहून त्यांनी अचानक ताफा थांबवला. ते गाडीतून खाली उतरले आणि आपले स्वतःचे आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले जाहिरातबाजी चे ते फलक काढून टाकण्यास सांगितले. एवढे करूनही ते थांबले नाहीत. त्यांनी प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांना बोलावून असे फ्लेक्स बोर्ड लावण्या संबंधी चे काही नियम करावेत, तसेच त्यावर बंधने आणावीत याबाबत कडक आदेश दिले. थोरातांनी अचानक असा पवित्रा घेतल्याने प्रसिद्धीलोलूप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाल्याचे दिसून आले. आता मिरवायचे कुठे असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसा सोशल मीडिया त्यांच्यासाठी मुक्त आहे. त्यामुळे तेथेही ही जाहिरातबाजी चालूच राहील.
थोरातांनी स्वतःहून कृतीतून अशा या उताविळ हौशी कार्यकर्त्यांचे कान स्वतः टोचल्याने इतरांनी यातून धडा घ्यायला हरकत नाही. बरे झाले नामदार थोरात साहेब तुम्ही स्वतः त्यांचे कान टोचले… धन्यवाद. असा सुर जनतेतून ऐकण्यास मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here