शिंपोरा येथील पूलाची तातडीने पुनर्रउभारणी होणार – सभापती प्रा.राम शिंदे निकृष्ट कामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाई होणार

0
323

जामखेड न्युज—–

शिंपोरा येथील पूलाची तातडीने पुनर्रउभारणी होणार – सभापती प्रा.राम शिंदे

  • निकृष्ट कामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाई होणार

खेड-मानेवाडी ते शिंपोरा या रस्त्यावरील पूल हा या भागातील शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्वाचा पूल आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी हा पूल नव्याने बांधण्यासाठी आठ दिवसात तत्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथील बैठकीत दिले.

ग्रामविकास मंत्री श्री.गोरे म्हणाले, वाहून गेलेल्या पूलाची पुनर्रउभारणी सभापती प्रा.राम शिंदे हेच करतील अशी लोकभावना माझ्यापर्यंत पोहोचली असून या बैठकीच्या माध्यमातून पूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसात नवीन तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पूलाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावा.

नव्या पूलास लोकभावनेस अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले.

सभापती प्रा.शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनात सभापती महोदयांच्या दालनात पूल उभारण्याच्या दृष्टिने बैठक झाली.

या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री.एकनाथ डवले, एम.एम.जी.एस.वाय. चे सचिव श्री.सतिश चिखलीकर, सह सचिव श्री.के.जी.वळवी, उप सचिव श्री.प्रशांत पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अहिल्यानगर श्री.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर श्री.आनंद भंडारी, सोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता श्री.साले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री.भदाणे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता.कर्जत, जि.अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने 25 मे, 2025 रोजी वाहून गेला. त्यानंतर 09 जून, 2025 रोजी सभापती महोदयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकाम कामाची चौकशी करावी, यासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पूलाची पुनर्रउभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे, असेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here