जामखेड चा पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचा अवैध धंदे वाल्यांना दणका
रोड रोमिओंचा बंदोबस्त करणार – पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी
जामखेड चा पदभार स्विकारताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अवैध धंद्यांना चाप लावत मटका व अवैध दारू विक्री दुकाने बंद करण्याची मोहिम उघडली आहे. या कारवाईचे जामखेड च्या जनतेने कौतुक केले आहे. जामखेड करांना सुरक्षित व सुरळीत वाटेल असेच काम करणार यासाठी जनतेने सहकार्य करावे असे चौधरी यांनी सांगितले.
जामखेड न्युजशी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, सात दिवसांपुर्वी जामखेड चे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला जामखेड मध्ये येताच लक्षात आले की, अनेक समस्या आहेत. या समस्यांचा बारकाईने अभ्यास करत आहे. वाहतूक कोंडी, कलाकेंद्रातील गैरप्रकार, गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध मटका, शाळा काॅलेज परिसरातील रोड रोमिओ अशा अनेक समस्या आहेत. याचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. यासाठी जनतेने सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.यामुळे जामखेड करांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार तसेच तीन जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जामखेड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू होते. परिसरातील अवैध धंदे, अवैध हत्यारे, बनावट दारू तसेच विना परवानगी दारू विक्री तसेच शहरात व तालुक्यात मटका व्यवसाय, कलाकेंद्रात अनेक अवैध कामे, डिजेचा थयथयाट, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास लावणे, अनेक गुन्हेगारांना आश्रय देणे, परिसरात गुंडांकडून दहशत पसरविणे, अनेक हाॅटेल लाँजिंग वर मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय व अवैध दारू विक्री, बाहेरच्या जिल्ह्यातील गुंडांना संरक्षण देणे तसेच अनेकांच्या जमीनीवर ताबा टाकणे, नेहमीच्या मारामाऱ्या अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे जामखेड परिसरात राजरोसपणे सुरू होते.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जामखेड चा पदभार स्विकारताच वरील समस्यांचा बारकाईने अभ्यास करत अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करत अवैध दारू विक्री व अवैध मटका यास चाप लावत शहरातील मटका बंद केला आहे. यामुळे जामखेड शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक यांच्या धडक कारवाई बद्दल कौतुक केले आहे तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घातला जाईल तसेच अवैध धंदे बंद करण्यात येतील असे सांगितले होते तरीही जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू होते.
मटका पेढीवाले प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका पेढ्या राजरोसपणे चालवतात होते. कलाकेंद्रात अनेक गैरप्रकार राजरोसपणे सुरू होते. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पदभार स्विकारताच अवैध धंदे वाल्यांवर कडक कारवाई ला सुरूवात केली आहे. यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात येतील तसेच रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यात येईल, वाहतुकीसाठी शिस्त लावली जाईल जेणेकरून जामखेड करांना सुरक्षित व सुरळीत वाटेल यासाठी जनतेने सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.