जामखेड तालुक्यातील अवैध धंदे मोडीत काढण्याचे नवीन पोलीस अधिकाऱ्यासमोर आव्हान अवैध हत्यारे, अवैध दारू विक्री, अवैध मटका, मारामाऱ्या, कलाकेंद्रातील गैरप्रकार यासह अनेक अवैध धंदे

0
535

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील अवैध धंदे मोडीत काढण्याचे नवीन पोलीस अधिकाऱ्यासमोर आव्हान

अवैध हत्यारे, अवैध दारू विक्री, अवैध मटका, मारामाऱ्या, कलाकेंद्रातील गैरप्रकार यासह अनेक अवैध धंदे

मराठवाड्याचे प्रवेशद्वार तसेच तीन जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जामखेड तालुक्यात सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरू आहेत. परिसरातील अनेकांकडे अवैध हत्यारे आहेत. राजरोसपणे बनावट दारू तसेच विना परवानगी दारू विक्री होत आहे. तसेच शहरात व तालुक्यात मटका व्यवसाय तेजीत आहे. तसेच जामखेड शेजारी नऊ कलाकेंद्र आहेत. कलाकेंद्रात अनेक अवैध कामे चालतात. डिजेचा थयथयाट, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायास लावणे, अनेक गुन्हेगारांना आश्रय देणे, परिसरात गुंडांकडून दहशत पसरविणे, अनेक हाॅटेल लाँजिंग वर मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय व अवैध दारू विक्री, बाहेरच्या जिल्ह्यातील गुंडांना संरक्षण देणे तसेच अनेकांच्या जमीनीवर ताबा टाकणे, नेहमीच्या मारामाऱ्या अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे परिसरात राजरोसपणे सुरू आहेत. हे आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समोर आहे.

नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घातला जाईल तसेच अवैध धंदे बंद करण्यात येतील असे सांगितले होते पण जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. मटका पेढीवाले प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका पेढ्या राजरोसपणे चालवतात याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. जामखेड परिसरात गुन्हेगारी वाढण्याची कारणे म्हणजे कलाकेंद्र हे एक कारण आहे. कलाकेंद्र नियमानुसार चालवावेत अशी मागणी होत आहे. याकडे नवीन पोलीस निरीक्षक कसे पाहतात हे महत्त्वाचे आहे.

कलाकेंद्रात कलेऐवजी डीजेच्या थयथयाट, कर्णकर्कश आवाज सुरूच आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू आहे. रात्रंदिवस परिसरातील अनेक हाँटेलवर आँनकाँल मुलींना बोलावले जाते. तसेच कलाकेंद्रात संपूर्ण राज्यभरातील हवसे, नवसे, गवसे यांचा राजरोसपणे कलाकेंद्रात वावर असतो. अनेक गुन्हेगार या ठिकाणी आश्रय घेतात. यामुळे गोळीबाराच्या घटना घडतात.

जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे. खुले आम चालू असलेल्या या अवैध धंद्याचा कधी बिमोड होणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. कोणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंद्याना अभय मिळत आहे. हेच खरे कोडे आहे.

जामखेड शहरासह तालुक्यात कल्याण व मुंबई मटका सकाळ पासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो. अनेकजण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात. कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो. तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो.

मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून अर्थिक गणित बिघडले आहे. जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून गोळीबार सारखे घटना घडत आहेत. हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त लावलेली वाहने अनेक ठिकाणी मावा गुटखा पान टपरी च्या नावाखाली नशेच्या पदार्थाची विक्री होत आहे. यामुळे तरूण वर्ग नशेच्या आहारी जात आहे. अनेक दोन नंबर करणारे व्हॉईट कॉलर जोमात धंदे करीत आहे व यांना आशिर्वाद कोणाचा भेटत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. आता नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे कसे आटोक्यात आणणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here