जामखेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चाय पे चर्चा
पुढारी वड टी सेंटर वर घेतला चहाचा आस्वाद
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जामखेड दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी जामखेड शहरातील प्रसिद्ध पुढारी वड येथील बंडु ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर थांबत चहाचा आनंद घेतला. यामुळे अजित दादांची शहरातील चाय पे चर्चा हा जामखेड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक म्हणून ओळखले जातात. ते शिस्तप्रिय आहेत. पण आज त्यांची ही हळवी बाजू पण समोर आली आहे. त्यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत जामखेड शहरातील पुढारी वड म्हणून ओळख असलेल्या बंडु ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर थांबुन चहा पीत चहा विक्रेत्याची संघर्षगाथा मांडली आहे. अजित दादांनी बंडु ढवळे या चहा विक्रेत्याने तयार केलेला चहा सुद्धा घेतला.
त्यांनी बंडु ढवळे या टपरी चालकाशी चाय पे चर्चा केली. त्यांनी सर्वसामान्य माणसाचा प्रामाणिकपणा, त्याचा संघर्ष आणि त्या कष्टातून कसं यश मिळते याची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही संघर्ष कथा आता चर्चा होत आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया एक्स या प्लॅटफॉर्मवर टपरी चालकाचा संघर्ष आणि त्याच्या मुलाचे यश यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे. दीपस्तंभ बाप म्हणून त्यांनी या वडिलाची पाठ थोपटली आहे. तर त्यांनी कष्ट बापाचे आणि यश लेकाचे असा संदेश या पोस्टमधून दिला आहे.
काय पोस्ट केली शेअर
“काल जामखेडच्या दौऱ्यावर असताना व्यस्त वेळापत्रकातून क्षणभर विश्रांती म्हणून एका चहाच्या टपरीवर सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा चहाचा एक घोट घेतला. चहा आनंदाचा, समाधानाचा यासाठीच म्हणतोय की, या टपरीचे मालक बंडू ढवळे यांच्याशी दोन घटका आपुलकीचा संवाद साधला तर कळलं की, त्यांनी अपार कष्टातून आपल्या मुलाला MBBS डॉक्टर बनवलं. स्वतः झिजून मुलाच्या जीवनाला, त्याच्या स्वप्नांना ढवळे यांनी आकार देण्याचं अमूल्य काम केलं. दिशादर्शकाची भूमिका बजावली. ढवळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच.. त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला माझा सलाम..!”
पुढारी वड विषयी
जामखेड शहरात पुढारी वड म्हणून सर्व परिचित आहे. याठिकाणी अनेक वर्षांपासून बंडू ढवळे यांचे चहाचे हाॅटेल आहे. खास चहा घेण्यासाठी शहरातील चारही कोपऱ्यातून लोक येतात, ढवळे यांच्या चहाची चवच न्यारी आहे. एकदा का येथील चहा घेतला की चहाची तलफ झाली कि, मित्रमंडळी येथेच चहा पिण्यासाठी येतात, यात स्पेशल चहा, साधा चहा, ब्लॅक टी, मसाला दुध, विलायची दुध असे कितीतरी प्रकार आहेत. स्वच्छता, टापटीप पणा, तत्पर सेवा, ग्राहकांना थंडगार अँरो फिल्टर पिण्याचे पाणी या सर्वांचा परिणाम जामखेड परिसरात पुढारी वड टी सेंटर एक ब्रँड झाले आहे. या ठिकाणी सर्व राजकीय व्यक्ती, नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी वर्ग आवर्जून चहा साठी येतात. जरी चहाची टपरी चालवली तरी ढवळे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले. एका मुलाचे एमबीबीएस पुर्ण झाले तर दुसरा दुसऱ्या वर्षाला आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात मुलाची पदवी घेताना वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला.
जामखेड शहरातील नगर रोडवर, पंचायत समिती शेजारी असलेल्या प्रसिद्ध ‘पुढारी वड’ येथील ‘हॉटेल पुढारी’चे संचालक प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचे चिरंजीव डॉ.प्रदीप प्रकाश ढवळे यांनी आपली एमबीबीएस पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमधून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं असून नुकताच पदवीदान समारंभ पार पडला तर दुसरा मुलगा रोहित सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जामखेड शहरासह मातकुळी, आष्टी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.