जामखेड न्युज – – –
जिल्ह्यातील एका युवा डॉक्टराने स्वतःच्या आजारपणाला कंटाळून विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरची घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव विश्वास अर्जुन कवळे असे असून, त्यांचे वय २९ वर्षे आहे. आजाराने पछाडलेल्या रुग्णांना मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांनीच स्वतः आजारपणाला कंटाळून, विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदरची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. विश्वास कवळे यांनी, टेबलवर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्टीमध्ये त्यांनी आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्यामुळे, या संदर्भात इतर कोणाला ही जबाबदार धरू नये, असा मजकूर लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी आपल्या भावांना सांगितले आहे की, तुम्ही आपल्या आई-वडिलांची काळजी घ्या. सदर डॉक्टरांनी नेमकी कोणत्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली आहे ? याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
डॉ. विश्वास कवळे यांनी बीएएमएस ही वैद्यकीय पदवी धारण केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी मिरज गावांमधील स्वतःच्या घरात खालच्या मजल्यावर दवाखाना सुरू केला होता. साधारणपणे दोन वर्षा पासून ते या दवाखान्यामध्ये रुग्णांची सेवा करत होते. काही दिवसापूर्वी त्यांनी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी त्यांना आशु या नावाने ओळखत होते.
शुक्रवारी रात्री बराच उशीरा झाला, तरी ते घरात आले नाहीत, त्यामुळे त्यांची आई त्यांना पाहण्यासाठी खालच्या मजल्यावरील दवाखान्यात आल्या होत्या. त्यावेळी डॉ. कवळे त्यांच्या खुर्चीमध्ये निपचित पडल्याचे त्यांना आढळून आले. हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर कुटुंबीय व मित्र त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, त्यांनी आपल्या संपत्तीचे वाटप कसे करावे ? तसेच आपल्यावर अंत्यसंस्कार कोठे करावेत ? या संदर्भात माहिती लिहिली होती. तसेच आत्महत्या करत असल्याबद्दल सर्वांची माफी ही मागण्यात आली होती. मृत्युनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्यावर पाथर्डी तालुक्यातील, पिंपळगाव-कासार, या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.










