जामखेड न्युज——
अखेर खोक्याला अटक, वाचा कोठून केली अटक
सहा दिवसांपासून पोलीस शोध घेत असलेल्या खोक्याला अखेर आज, बुधवारी सकाळी प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच ‘खोक्या’ उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्याने एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले होते.
तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. सहा दिवसांपासून पोलीस शोध घेत असताना अखेर आज, बुधवारी सकाळी खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक झाली. त्यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले सुरेश धस?
“अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केलेली आहे, त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. विरोधकांनी माझ्यावर केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही. मी कुठल्याही पोलिसांना फोन केलेला नाही. मी सुरुवातीपासूनच त्याला अटक करा असं म्हटलं आहे.
त्याने चूक केली असेल तर त्याच्या कारवाई करा, हेच माझं म्हणणं आहे. त्याला अटक झालेली आहे. त्याच्यावर जी काही कलमं लागली असतील त्यानुसार पोलीस कारवाई करतील” अशी रोखठोक प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
खोक्याचे नेमके प्रकरण काय?
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी येथे आणून पाच ते सहा जणांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. यात पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बापलेकाला मारहाण केल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले.