रोहित पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांना निमंत्रण
महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदे’च्या माध्यमातून कर्जतमध्ये २६ ते ३० मार्च दरम्यान ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील नऊशेहून अधिक पैलवान उपस्थित राहणार आहेत. राज्यातील आजवरच्या सर्व ‘महाराष्ट्र केसरी’ मल्लांच्या उपस्थितीत ३० मार्च रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेचं निमंत्रण मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रोहित पवारांच्या वतीने देण्यात आले यावेळी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे हेही उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 66 वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्मयपद अर्थात ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अहिल्यानगर येथील कर्जत-जामखेडमध्ये रंगणार आहे. परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि आयोजक संस्थेचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याबाबत बोलताना लांडगे म्हणाले, कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 26 ते 30 मार्चदरम्यान पार पडेल. अहिल्यानगर तालीम संघ व कर्जत-जामखेड कुस्तीगीर यांच्या सहकार्याने आणि रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेड यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
1960 पासून आम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहोत. आमचीच संघटना अधिकृत असून, मोहोळ कुटुंबाच्या वतीने देण्यात येणारी गदाच या वेळी दिली जाणार आहे. अशोकराव मोहोळ यांनी आधीच त्याची घोषणा केली आहे. आमच्या स्पर्धेत 45 जिल्हा संघटनेचे मल्ल सहभागी होणार आहेत. यात 900 खेळाडू, 150 पंच, 300 प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. यात कुठल्याही मल्लावर अन्याय होणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे.’
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोणतेही वाद होऊ नयेत किंवा कुठल्याही निर्णयावरून विवाद उत्पन्न होऊ नयेत. याकरिता एका समितीचे गठण करत आले आहे, असे सांगतानाच दुसऱ्या संघटनेबाबत आम्ही कोर्टात अपील केले असून, त्याचा निकाल लवकरच अपेक्षित आहे, असेही लांडगे यांनी सांगितले.
राज्यातील मल्लांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
रोहित पवार म्हणाले, ‘काही संघटना मल्लांवर बंदी घालण्याची भाषा करीत आहेत. संघटना ही मल्लांच्या भल्यासाठी असते. दोन वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या संघटनेच्या धमक्मयांना मल्लांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मल्लांनी कुठल्याही धमक्मयांना न घाबरता मनात कुठलीही भीती न बाळगता परिषदेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी व्हावे.’ आम्हाला महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेची मान्यता आहे. सर्व संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. मल्लांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शांत होतो. मात्र, अहिल्यानगरमधील स्पर्धेत मल्लांवर अन्याय झाल्याचे सर्वांनी पाहिले. आम्ही सर्व मल्लांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत, असे रोहित पवार म्हणाले.
स्पर्धेत राजकीय हस्तक्षेप नाही
ठराविक मल्लांना जिंकवण्यासाठी अलीकडे कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. मात्र, परिषदेच्या कुस्ती स्पर्धेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. खेळातील राजकारणामुळे मल्लांच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच राजकारण न आणता महाराष्ट्र केसरी पार पाडण्यावर आमचा फोकस राहील, असेही लांडगे व पवार यांनी सांगितले.