गेल्या डिसेंबरमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड या जवळच्या सहकाऱ्याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
त्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेले मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मुंडें यांच्या राजीनाम्याबाबत माहिती देतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुडेंचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पाठवल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे.
त्यांना सहआरोपी करून… एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणाले, “मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे.
पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज आहे. तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू!”
राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.”