केंद्रप्रमुख संघटनेच्या राज्याच्या सरचिटणीसपदी राम निकम यांची निवड
जामखेड तालुक्यातील शिक्षक नेते केंद्रप्रमुख श्री राम निकम यांची राज्याच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी गोंदवले जिल्हा सातारा या ठिकाणी राज्याची महामंडळ सभा ग्राम विकास मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी राज्याच्या केंद्रप्रमुख असोसिएशनची राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये जामखेड येथील शिक्षक नेते केंद्रप्रमुख श्री राम निकम यांची राज्याच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
श्री निकम हे 1991 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर ते पदवीधर शिक्षक ,ग्रेड मुख्याध्यापक या पदावर ही त्यांनी काम केले .एक वर्षांपूर्वी त्यांची केंद्र पाटोदा तालुका जामखेड येथे केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झाली. ते सेवेत रुजू झाल्यापासून शिक्षक संघटनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होते.
त्यांनी तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आतापर्यंत शिक्षक संघटनेत काम केले आहे. तसेच त्यांच्या पत्नी सौ सीमा निकम यादेखील शिक्षक बँकेच्या व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेले आहे.तसेच शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाचाही प्रभारी पदभार त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांना शिक्षक संघटनेच्या विविध प्रश्नांची जाण आहे. यामुळेच त्यांची राज्य कार्यकारणीवर निवड झाली आहे.
या निवडीबद्दल राज्याचे नेते संभाजीराव थोरात, उपनेते रावसाहेब रोहकले, केंद्रप्रमुख संघटनेचे नेते रामराव जगदाळे, केंद्रप्रमुख संजय कळमकर, आबासाहेब जगताप, संजय शेळके, प्रवीण ठुबे, बाळासाहेब झावरे, सुरेश निवडुंगे आदींनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल व जिल्ह्याला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये व केंद्रप्रमुखांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.