जामखेड न्युज – – –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज ६१ वा वाढदिवस आहे. राज्यात सध्या अनेक संकटांची मालिकाच सुरू असल्याचे दिसत आहे, करोनाचे संकट ओढावलेले असताना आता अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातलं आहे. अनेक दुर्घटनांमध्ये कित्येकांना जीव देखील गमावावा लागल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझा वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन आपल्या समर्थकांना केलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवरुन आपण शुभेच्छा स्वीकारु असंही उद्धव ठाकरेंनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच स्पष्ट केलं आहे. असं असतानाच थेट ऑस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय. तर या ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्याने चक्क मराठीमध्ये उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचे भारतामधील उच्चायुक्त बॅरी ओफारील यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत त्यांना मराठीत शुभेच्छा दिल्यात. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उद्धव ठाकरेजी,” असं म्हणत बॅरी यांनी मराठीत शुभेच्छा दिल्यात. तसेच पुढे ट्विटमध्ये लिहिताना ते म्हणतात, “हे वर्ष तुम्हाला आनंदाचं जावो यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो.” बॅरी हे दिल्लीमध्ये नियुक्त असले तरी अनेकदा महाराष्ट्रामधील कामांसाठी ते वरचे वर मुंबईमध्ये येतात. अशाच एका भेटीदरम्यानचा फोटो त्यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलाय. हा फोटो नुकताच म्हणजेच करोना कालावधीमध्येच काढलेला असल्याचं दोघांच्या तोंडावर असणाऱ्या मास्कमुळे स्पष्ट होत आहे. फोटो शिवसेना भवनातील असल्याचं फोटोमध्ये मागील बाजूस असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीवरुन लक्षात येते. फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे बॅरी यांना महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट देताना दिसत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय संघातील मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घाष्यु मिळो अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय अजिंक्य रहाणेनेही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दिर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” असं अजिंक्य म्हणालाय.
याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
राज्यावर एकामागून एक येणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करु नका असं उद्धव ठाकरेंनी सोमवारीच स्पष्ट केलं होतं. “कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये.”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.
तसेच, “वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये, तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू.” असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. “राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, म्हणून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
“पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,” असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे.