नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार – प्रा. राम शिंदे
जामखेड शहरात भव्य मिरवणुक व नागरी सत्कार संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास टाकला व विधानपरिषद सभापतीपदी निवड केली त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले असल्याने विद्यार्थी कसे सांभाळायचे याचा अनुभव आहे. विधानपरिषदेत विविध पक्षाचे, विविध विचाराचे, अनुभवी सदस्य असल्याने त्यांचा हेडमास्तर म्हणून काम करताना कसरत आहे.
नेतृत्वाने विश्वास टाकल्याने ते सिध्द करायचे आहे याबाबत अवघड वाटत नाही त्यातून मार्ग काढू व नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल भव्यदिव्य मिरवणूक व नागरी सत्कार रविवारी जामखेड येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अयोजीत केला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झाला. वेगवेगळे षडयंत्र रचले गेले त्यामुळे मला व कार्यकर्ते यांना पराभव मान्य नाही.
भारतीय जनता पक्षाचा २९ वर्षापासून प्रामाणिक व निष्ठेने काम करत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्ते झुंजले पण पराभव अल्पशा मतांनी झाला त्यामुळे विजयी मिरवणूक काढून शकलो नाही. परंतु पक्षाने सभापतीपदासाठी संधी दिली.
विधानपरिषदेत जेंव्हा सभापती पदासाठी ठराव आला त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अँड. अनिल परब, भाई जगताप यांनी बहुमतानी नाही तर एकमताने ठराव पास केला. विधानसभा निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झाला यामुळे मिरवणूक काढता आली नव्हती सभापती निवडीनंतर प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघात आलो यामुळे कार्यकर्त्यांनी वाद्यवृंदाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले याबद्दल महायुतीचे नेते व कार्यकर्ते यांचे आभार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
चौकट
विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदेंचे चोंडी जामखेड शहरात जोरदार स्वागत
विधान परिषदेच्या सभापतिपदी वर्णी लागल्यानंतर प्रा. राम शिंदे रविवारी (दि. २९) प्रथमच जामखेड तालुक्यातील चोंडी या मुळ गावी आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे देवीचे दर्शन घेऊन महादेव मंदिरात अभिषेक केला यानंतर चोंडी गावात गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सायंकाळी चार वाजता जामखेड शहरातून भव्य दिव्य मिरवणूक भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली तसेच जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण केली. शिंदे यांच्या आगमनप्रसंगी ठिकठिकाणी सभापती महोदयचे बॅनर व कमानी कार्यकर्त्यांनी लावल्या होत्या. खर्डा चौकात ३० फुट उंचीचे कटआऊट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी क्रेनच्या साहाय्याने भला मोठा हार आ. राम शिंदे यांना घालण्यात आला. या वेळी शिंदे यांनीही हातवारे करून नृत्य केले तसेच लेझीम पथकापुढे लेझीम खेळून आनंद व्यक्त केला.