बीडमध्ये अधिकाऱ्याच्या घरात दागिने नोटांची थप्पी बॅगा अन् खोके
बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा आणि खोके सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर येथील रहिवाशी असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल 2 कोटी 7 लाख 31 हजार रुपयांची माया कमावल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नारायण खाडे (Haribhau Khade) तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती हरिभाऊ नारायण खाडे (Haribhau Khade) हे बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्याकडे सोने आणि पैसे आढळून आले आहेत. खाडे यांच्या गैर कारभारामध्ये पत्नीने त्यांना मदत केल्याने खाडे दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत असताना एक कोटीच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांना अटक करण्यात आली होती.
आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी मनीषा खाडे यांच्या विरोधात देखील बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खाडे यांच्या घरात एक कोटीची रोख रक्कम एक किलो सोने अशी दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली. उत्पन्नापेक्षा 116% अधिक ही संपत्ती होती. संपत्ती संपादित करण्यासाठी त्याच्या पत्नी मनीषा खाडे यांनी मदत केल्याने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात 16 मे 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते.
चौकशी दरम्यान 10 ऑगस्ट 2023 ते 16 मे 2024 या कालावधीत हरिभाऊ खाडे यांनी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये (116.28 टक्के) संपत्ती मिळवल्याच निष्पन्न झालं आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे 62 लाख 79 हजार953 रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर करुन हरिभाऊ खाडे यांना मदत केल्याचे चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी हरिभाऊ नारायण खाडे त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.